राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद, झेलण्याची आणि पतवून लावण्याची ताकद धमक शरद पवारांमध्ये आहे. सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या शरद पवारांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही, शरद पवार जरी निवडणूक लढवणार नसले तरीही माढाची जागा राष्ट्रवादीच जिंकेल. विजयाचा पेढा तुम्हाला वर्षावर घरपोच पाठवू असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी माघार घेतल्यावर जी टीका केली त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही माढाही जिंकू आणि उर्वरीत महाराष्ट्रही जिंकू, विजयाचा पेढा वर्षा या तुमच्या निवासस्थानी येऊन भरवू अशीही टीका धनंजय मुंडे यांनी केली.

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर केला. त्यानंतर शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा पहिला मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याच टीकेला आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण माढा येथून निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. पार्थ पवार मावळमधून, सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार आहेत. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये अशी चर्चा आम्हा कुटुंबीयांमध्ये झाली. त्यामुळे मी माघार घेतली आहे. आत्तापर्यंत १४ निवडणुका जिंकलो आहे. मला निवडणुकांना सामोरे जायची भीती नाही. मात्र कुटुंबीयांशी झालेल्या चर्चेनंतर मी निर्णय घेतला असे शरद पवार यांनी म्हटले. मात्र शरद पवार यांची माघार हा युतीचा पहिला विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.याच प्रतिक्रियेवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.