फेरीवाले, गर्दुल्ले यांचा वावर वाढला

मुंबई : सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशावर चार जणांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना समोर आल्यानंतर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच असलेला लोकल प्रवास फे रीवाले, गर्दुल्ले यांच्यासाठीही खुला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देताना स्थानकातील प्रवेशद्वारांवर असलेल्या सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणाच दिसून येतो. रेल्वे पोलीस व तिकीट तपासनीस प्रवेशद्वारांवर तपासणीच करत नसल्याने अनेकजण स्थानकात सहजरीत्या प्रवेश मिळवतात.

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आली. जून २०२० मध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी स्थानकात प्रवेश देताना प्रवेशद्वारांजवळ लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासनीस तैनात असत. प्रवाशांजवळील तिकीट, ओळखपत्र तपासून त्यांना स्थानकांत प्रवेश दिला जात असे. प्रवाशांची मागणी वाढताच विविध श्रेणींना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यानंतर ठरावीक वेळेतही सामान्य प्रवाशांना प्रवासाची मंजुरी दिली. ही मंजुरी दिल्यावर काही दिवस रेल्वे पोलीस व तिकीट तपासनीसांकडून सर्व स्थानकांतील प्रवेशद्वारांवर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या प्रवास वेळेत त्यांचे ओळखपत्र व तिकीट तपासले जात होते. त्यानंतरही काही दिवस सुरू असलेली ही तपासणी बंद झाली आणि अनेक प्रवासी स्थानकात बिनदिक्कत प्रवेश मिळवू लागले.

करोनाची दुसरी लाट येताच लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध लागू करताना फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. १५ एप्रिलपासून स्थानकातील प्रवेशद्वारांवर ओळखपत्र व तिकीट तपासणीसाठी पुन्हा लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासनीसांची फौज ठेवण्यात आली, तर स्थानकातील पूर्व व पश्चिमेकडील मोजकीच प्रवेशद्वारे सुरू ठेवली. काही दिवस सुरू असलेली ही तपासणी आता बऱ्याच स्थानकांत बंद झाली आहे. तपासणी होत नसल्याने अत्यावश्यक सेवेत नसलेले प्रवासीही प्रवास करत आहेत. मध्य रेल्वेवर आतापर्यंत अत्यावश्यक सेवा कर्मचारी नसलेल्या ८०० प्रवाशांना पकडले आहे, तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या प्रवाशांचीही धरपकड के ली आहे. पश्चिम रेल्वेवरही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय लोकलमध्ये फे रीवाल्यांचाही वावर वाढला असून त्यांच्यावर कारवाई के ल्यानंतरही पुन्हा फेरीवाले लोकलमध्ये वस्तूविक्री करताना दिसतात. एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर २,५०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बुधवारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील एका प्रवाशावर चार जणांनी चोरीसाठी हल्ला के ला. यातील दोन आरोपी फरार झाले असून एका २१ वर्षीय पुरुषाला व एका महिलेला अटक के ली आहे. या घटनेनंतर स्थानकातील प्रवेशद्वारांवर होत असलेली  तपासणी का थांबवण्यात आली, असा प्रश्न समोर आला आहे. यासंदर्भात लोहमार्ग पोलीस आयुक्त कै सर खालिद यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. सुरुवातीला रेल्वे पोलीस, तिकीट तपासनीस स्थानकातील प्रवेशद्वारांवर तपासणीसाठी होते. आता ही तपासणी जवळपास बंदच आहे. परिणामी फे रीवाले, गर्दुल्ले सहज प्रवेश मिळवतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. फक्त विविध फलाट, पादचारी पुलांवर तिकीट तपासनीसांकडून तपासणी होत असते. 

लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ