महामंडळाची पंधरा कलमी नियमावली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून संपत्ती, ऐश्वर्याचे प्रदर्शन टाळावे, व्यक्तिगत आणि पक्षीय   बडेजावासाठी संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे भाषा, साहित्य व संस्कृतीचे व्यासपीठ असल्याने उद्घाटन व समारोपप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तिंची अकारण गर्दी असू नये, या आणि अशा पंधरा सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९० व्या साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या डोंबिवलीच्या ‘आगरी युथ फोरम’ला केल्या आहेत. महामंडळाने आयोजक संस्थेला इतक्या स्पष्ट शब्दांत पहिल्यांदाच सूचना केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत संमेलन आयोजनावरील खर्चाची ‘कोटीच्या कोटी’उड्डाणे झाली असून ही संमेलने राजकारणी किंवा राजकीय पक्षांशी संबंधित संस्थांच्या कह्यात गेली आहेत. संमेलनावर त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळविलेला कब्जा हा साहित्यप्रेमींसाठी चिंतेचा विषय झाला होता. साहित्य संमेलन आयोजन व अन्य काही कारणांमुळे महामंडळाचे कामही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्या पाश्र्वभूमीवर महामंडळाने घेतलेल्या या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत ही नियमावली तयार करण्यात आली. निमंत्रक संस्थेबरोबरच महामंडळावरही त्याचे पालन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरुन तसेच एकूण संमेलन आयोजनात कोणाच्याही, कोणत्याही व्यक्तिगत अथवा पक्षीय बडेजावाचे, ऐश्वर्याचे, संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी येथील व्यासपीठ व हे संमेलन वापरले जाणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक राहील, अशी स्पष्ट ताकीद या पत्रात देण्यात आली आहे.