News Flash

हवामान खात्याचा अंदाजच खरा!

जुलैतील मान्सूनबाबत भारतीय हवामानखात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून देशभरात केवळ ८० टक्के पाऊस झाला आहे.

| August 2, 2015 06:44 am

जुलैतील मान्सूनबाबत भारतीय हवामानखात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून देशभरात केवळ ८० टक्के पाऊस झाला आहे. खासगी संस्था स्कायमेटने याकाळात १०४ टक्के पावसाचा तर केंद्रीय वेधशाळेने ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. ऑगस्टमध्ये ९० टक्के पाऊस पडेल, असे केंद्रीय वेधशाळेने स्पष्ट केले असून दक्षिण भारताला जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय वेधशाळेकडून यावर्षीचा मान्सून सरासरीपेक्षा १२ टक्के कमी असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र जून महिन्यात संपूर्ण देशात १३ टक्के अधिक पडलेल्या मान्सूननंतर खासगी स्कायमेटने पुन्हा एकदा सामान्य मान्सूनचा अंदाज व्यक्त करत जुलैमध्येही १०४ टक्के पाऊस पडेल याची हमी दिली होती. मेडल ज्युलिअन ऑक्सिलेशन प्रभावी नसल्याने मान्सूनचा जोर कमी राहील तसेच अलनिनोचा वाढता प्रभावही देशातील मान्सूनच्या विरोधात जाईल अशी अटकळ केंद्रीय वेधशाळेने मांडली होती. मात्र या दोन्ही स्थितींचा फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचा दावा स्कायमेटने केला होता. जूनप्रमाणेच जुलैमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची स्कायमेटने शक्यता मांडली होती व त्यात दहा टक्के चढउतार होऊ शकेल असे म्हटले होते. प्रत्यक्षात जुलैमधील पाऊस फक्त ८० टक्के झाला आणि दीडशे वर्षांहून अधिक काळ भारतीय मान्सूनचा अभ्यास करणाऱ्या वेधशाळेची भीती खरी ठरली. स्कायमेटनुसार जुलैमध्ये ८४ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के मान्सूनचा अंदाजही त्यांनी चार टक्के कमी करून ९८ टक्क्य़ांवर आणला आहे.
दक्षिण भारतात दुष्काळ?
ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा दहा टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने नोंदवला आहे. संपूर्ण मान्सूनही सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पडणार असल्याची शक्यता वेधशाळेने मांडली आहे. त्यामुळे देशात विशेषत दक्षिण भारतात दुष्काळाचे सावट गडद होण्याची शक्यता आहे.

मुंबईत फक्त ४५ टक्के
जूनमध्ये पडलेल्या तिप्पट पावसाच्या जोरावर जुलैअखेरही उपनगरांतील सरासरी १३ टक्के जास्त राहिली असली तरी जुलैमध्ये मात्र फक्त ४५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या दहा वर्षांतील जुलैमध्ये सरासरी ११०० मिमी पाऊस पडला होता. त्या पाश्र्वभूमीवर पावसाची तूट लक्षणीय आहे. गेल्या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या अखेरीस सर्व तूट भरून काढली होती. जूनमध्ये धो धो बरसूनही गेल्या वर्षीपेक्षाही यंदा स्थिती चिंताजनक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 6:44 am

Web Title: weather forecast assumption correct
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’ शहरांच्या निवडीत राजकारण – चव्हाण
2 आदिवासी आमदार धनगर आरक्षणाविरोधात
3 मंत्रिमंडळाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची सर्वाधिक दांडी
Just Now!
X