उबर या ‘वेब कॅब’च्या चालकाने तरुणीवर बलात्कार केल्याच्या घटनेने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश ढवळून निघाल्यानंतर आता महाराष्ट्रात या ‘वेब कॅब’ना रस्ते बंद करण्याचा आदेश परिवहन सचिव शैलेशकुमार यांनी दिल्याचे वृत्त आहे. याबाबतचे आदेश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचेही संबंधित वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे. मात्र, या ‘आदेशां’बाबत परिवहन आयुक्त महेश झगडेच नव्हे तर परिवहन मंत्री दिवाकर रावतेही अनभिज्ञ असल्याचे समजते.
महाराष्ट्रात चालणाऱ्या सर्व ‘वेब कॅब’ तातडीने बंद कराव्यात असे आदेश परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी परिवहन आयुक्त महेश झगडे यांना दिले आहेत. परिवहन आयुक्त याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करतील, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याबाबत केंद्राने राज्य सरकारला सूचना दिल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे बुधवारीच हे आदेश आले असताना बुधवारी दुपारीच महेश झगडे यांनी सर्व ‘वेब कॅब’ ऑपरेटर्सची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेचे ठोस उपाय योजण्याच्या सूचना केल्या आहेत. या ऑपरेटर्सनी आज, गुरुवारी दुपापर्यंत सर्व चालकांची माहितीही परिवहन कार्यालयात जमा करावी, असे आदेश झगडे यांनी दिले आहेत. सुरक्षा उपायांचा आराखडा ३१ डिसेंबपर्यंत सादर करून त्याची अमलबजावणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची कालमर्यादाही झगडे यांनी घालून दिली आहे. त्यामुळे मग परिवहन सचिवांचे आदेश आयुक्तांनी धाब्यावर बसवले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत परिवहन आयुक्त झगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, बुधवारी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना या आदेशांबाबत विचारले असता,  अशा आदेशांबाबत आपल्याला तरी माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिवेशन चालू असताना परिवहन विभागाचा सचिव आपल्या मंत्र्याच्या परोक्ष असे आदेश कसे देतो, असा प्रश्नही निर्माण होत आहे. याबाबत परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.