आर्थिक राजधानीबरोबरच देशाची ‘करोना राजधानी’ बनलेल्या मुंबईत, या अभूतपूर्व परिस्थितीशी मुंबई महापालिकेचे योद्धे जिवाची पर्वा न करता लढत आहेत. तरीही सर्वसामान्य मुंबईकर धास्तावला आहे. त्याला माहिती हवी आहे, दिलासा हवा आहे. यासाठीच करोनाविरोधातील लढय़ाचे शिलेदार आणि मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी खास ‘लोकसत्ता’ वाचकांच्या भेटीला येत आहेत. ‘लोकसत्ता विश्लेषण’च्या माध्यमातून शुक्रवारी होणाऱ्या या वेबसंवादात घरबसल्या सर्व प्रकारचे शंकानिरसन करण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या शहरांपैकी एक म्हणजे मुंबई. पण तरीही बाधितांच्या तुलनेत मृतांचे गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कितीतरी कमी. हे कसे काय साध्य होत आहे? याचे कारण म्हणजे या संकटसमयी परदेशींकडून होत असलेले मार्गदर्शन. मग ते करोनाबाधित आणि संशयितांचे अलगीकरण आणि विलगीकरण असो किंवा करोनाबाधितांवर उपचार करण्याची अन्य रुग्णालयांमध्ये सुरू केलेली सुविधा असो, विषाणू फैलावावरील हल्ला असा सर्वंकष आणि विविधांगी होता.

आजघडीला देशात सर्वाधिक चाचण्या मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने अतिशय वेगाने पावले उचलली. डॉक्टरांच्या मदतीला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फौजही उभी केली. आता तात्पुरत्या स्वरूपात मोठय़ा संख्येने डॉक्टर, परिचारिकांना पालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहे. आरोग्य खात्यातील कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविकांनी घरोघरी फिरून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात यश मिळत आहे. या सगळ्याची परदेशी यांच्याकडूनच मिळणारी इत्थंभूत माहिती वाचकांना नक्कीच आश्वस्त करणारी ठरेल.

सहभागी कसे व्हाल?

करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी-संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबच्या माध्यमातून म्हणजे मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबद्वारे होईल. त्यासाठी http://tiny.cc/Loksatta_Vishleshan या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. ती केल्यावर आपल्या इनबॉक्समध्ये एक संदेश येईल. त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर आपल्या ईमेल आयडीवर एक संदेश येईल. या संदेशावर शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी वेबसंवादाच्या काही वेळ आधी क्लिक करून सहभागी होता येईल. मात्र जागा मर्यादित आहेत, याची नोंद घ्यावी.  अधिक माहितीसाठी या https://loksatta.com संकेतस्थळाला भेट द्या. याशिवाय वाचकांना सोबतचा क्यूआर कोडही स्कॅन करता येईल.