चित्रीकरणासाठी मागणी; आपटा, सीएसएमटी, तुर्भे स्थानकाला पसंती

गेल्या काही वर्षांत चित्रपट, जाहिरातींबरोबरच ‘वेब सिरीज’चे निर्मातेही चित्रीकरणासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात भर पडली आहे. वेब सिरिजच्या चित्रिकरणासाठी सीएसएमटी, आपटा, तुर्भे या स्थानकांना निर्मात्यांकडून पसंती मिळते आहे.

रेल्वे प्रवासात वेब सिरीज पाहण्याकरिता मोबाईलमध्ये डोके खुपसून बसणारे असंख्य प्रवासी दिसतात. याच वेब सिरिजच्या चित्रीकरणाकरिता रेल्वे स्थानकांना पसंती मिळते आहे. २०१९ मध्ये सुमारे पाच सिरिजच्या चित्रिकरणासाठी मध्य रेल्वेच्या स्थानकांना पसंती देण्यात आली. चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी मध्य रेल्वेच्या आपटा स्थानकाला नेहमीच पसंती मिळते. यावेळी ‘अफसोस’ आणि ‘समांतर’ या दोन वेब सिरिजचे चित्रिकरणही आपटा स्थानकात तीन दिवस करण्यात आले आहे. त्यानंतरच्या वेब सिरिजमध्ये ‘क्लास ऑफ ८३’चे तुर्भे स्थानकात, ‘१००’ नावाच्या सिरिजचे सीएसएमटी आणि ‘वॉर स्टोरी १९६२’चे वठार स्थानकात चित्रिकरण झाले आहे.

यंदा १७ विविध चित्रपट, वेब सिरिज, जाहिराती, मालिका यांचे चित्रिकरण मध्य रेल्वेवर झाले. अभिनेते रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दरबार’ चित्रपटाचे चित्रिकरण पनवेलमध्ये झाले. या चित्रपटाचे जून २०१९ मध्ये तब्बल ९ दिवस चित्रिकरण झाले असून यातून २२ लाख १० हजार रुपये महसुल मध्य रेल्वेला मिळाला आहे. यापाठोपाठ सलमान खान असलेल्या ‘दबंग ३’च्या वठार स्थानकात झालेल्या एका दिवसाच्या चित्रिकरणातून १५ लाख ७० हजार रुपये महसुल प्राप्त झाला आहे.

महसुलात वाढ मोठी वाढ

२०१८ मध्ये मध्य रेल्वेवर नऊ चित्रपट, मालिका, जाहिरांतीचे चित्रिकरण झाले होते. त्यावेळी ६१ लाख ४५ हजार रुपये महसुल मिळाला होता. यंदा महसुलात चांगलीच वाढ झाली असून ती वेब सिरिजमुळेच असल्याचे सांगितले जाते. मध्य रेल्वेला २०१९ मध्ये चित्रिकरणातून १ कोटी १६ लाख ६६ हजार ३७५ रुपये महसुल मिळाला आहे. अन्य काही चित्रपटांमध्ये ‘विजेता’ या मराठी चित्रपटाचा समावेश असून त्याचे वठारमध्ये चित्रिकरण झाले. तर लाल सिंग चढ्ढा, मुंबई सागा, मलंग इत्यादी चित्रपटांसह ‘हरामी’ या माहितीपटाचेही चित्रिकरण झाले आहे.

चित्रिकरणासाठी लोकल, रेल्वे फलाट किंवा अन्य परिसर वापरल्यास त्यानुसार शुल्क आकारले जाते. यंदा चित्रीकरण वाढले असून मध्य रेल्वेला यातून चांगलाच महसूल मिळाला आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.