News Flash

नवउद्य‘मी’ : वेबवाहिनीचा निर्माता

मनोरंजनाचे माध्यम सातत्याने बदलत आहे. कृष्णधवल टीव्हीची जागा कलर टीव्हीने घेतली.

 

इंटरनेट हे मनोरंजनाचेही मोठे माध्यम बनले आहे. यूटय़ूबसारख्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडीओ पाहण्याला मिळत असलेली पसंती आणि इंटरनेटची सहज उपलब्धता यामुळे आता खास वेबवरून अर्थात इंटरनेटवरून प्रसारित होणाऱ्या वेबवाहिन्यांचे प्रस्थ वाढत चालले आहे. ‘वेब टॉकीज’ हे अ‍ॅप त्याचेच एक उदाहरण आहे.

मनोरंजनाचे माध्यम सातत्याने बदलत आहे. कृष्णधवल टीव्हीची जागा कलर टीव्हीने घेतली. यानंतर संगणक मग मोबाइल मनोरंजनाचे माध्यम बनला. मोबाइलवर मनोरंजन उपलब्ध करून देण्यासाठी आता मनोरंजनाची निर्मिती करणाऱ्यांनीही निर्मिती प्रक्रियेत बदल केला आहे. यामुळेच सध्या वेब मालिकांचा गाजावाजा होऊ लागला आहे. या वेब मालिकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करत असतानाच भारतीय नवउद्योगही या क्षेत्रात उतरू लागले आहेत.

आठवडय़ातून एकदाच लागणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना पुसून काढत दूरचित्रवाणी क्षेत्रात ‘डेलिसोप’चा शिरकाव झाला. यानंतर प्रेक्षक रोज ठरावीक वेळांना दूरचित्रवाणीसमोर खिळून राहू लागले. हे चित्र काही वष्रे स्थिरावत असतानाच वेब मनोरंजनाचा उदय होऊ लागला. यामध्ये सुरुवातीला काही विनोदी व्हिडीओज, चित्रपट, लघुपटांची गर्दी होती. पण याकडे लोक आकर्षित होत असल्याचे लक्षात आल्यावर अनेक वाहिन्यांनी त्यांचे कार्यक्रम मोबाइलवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. पण जे टीव्हीवर दिसते तेच या मोबाइल अ‍ॅपवर दिसू लागले. यामुळे झाले एवढेच की लोकांना आपल्या सोयीने आवडत्या मालिका पाहण्याची संधी मिळू लागली. या सर्वातच एक स्वतंत्र संकेतस्थळ वाहिनी निर्माण करावी अशी संकल्पना रुजू लागली होती. यामुळेच ‘सीआयडी’, ‘बिदाई’, ‘उतराण’सारख्या मालिकांची पटकथा लिहिणारे व मनोरंजन क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असणारे वीरेंद्र शहाणे यांनी अशाच एका वेबवाहिनीची निर्मिती करण्याचे ठरविले. सिव्हिल अभियंता असलेल्या शहाणे यांनी ‘परवरीश’, ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या मालिकांचे सर्जनशील दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. या क्षेत्रात काम करत असतानाच त्यांना माध्यमाच्या बदलाची चाहूल लागली. यामुळेच त्यांनी वेबआधारित वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला यातूनच ‘वेब टॉकीज’ या वाहिनीचा जन्म झाला.

वेबवाहिनी म्हटली की आपल्या यूटय़ूबवर एकाच यूआरएलवर सातत्याने अद्ययावत होणारे व्हिडीओज डोळ्यासमोर येतात. पण ‘वेब टॉकीज’ने ही संकल्पना बदललली आहे. एखाद्या मनोरंजन वाहिनीप्रमाणेच याचे काम चालते. या वाहिनीसाठी मालिका तयार करणाऱ्या विविध निर्मिती संस्था कार्यरत आहेत. या निर्मिती संस्थांकडून तयार होणाऱ्या मालिका या वाहिनीवर उपलब्ध होत असतात. ऑनलाइन बाजारात केवळ मनोरंजनात्मक व्हिडीओजना चांगली मागणी होती. मात्र या माध्यमावर काही गंभीर मालिका याव्यात या उद्देशाने एक स्वतंत्र व्यासपीठ उभे राहणे आवश्यक होते. प्रेक्षकांची ही गरज भागविण्याचे काम ‘वेब टॉकीज’ हे अ‍ॅप करत असल्याचे विक्रम शहाणे यांनी सांगितले. या संकेतस्थळ आणि अ‍ॅपवर खास संकेतस्थळासाठी निर्मिती केलेले व्हिडीओज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचबरोबर टॉकीजला पर्याय म्हणून या अ‍ॅपकडे पाहिले जावे यासाठी स्वतंत्र चित्रपटांची निर्मितीही केली जाणार आहे. यातील पहिला ‘यू मी और घर’ चित्रपट १० फेब्रुवारी रोजी संकेतस्थळावर प्रदर्शित होणार आहे. अवघ्या ६० रुपयांमध्ये हा चित्रपट पाहता येणार असल्याचेही शहाणे यांनी नमूद केले. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला मोफत व पैसे भरून असे पर्याय उपलब्ध आहेत. यातील तुम्ही तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडू शकता.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

हा उद्योग उभारण्यासाठीची सुरुवातीची गुंतवणूक शहाणे यांनी केली असून नुकतेच पुण्यातील बीज भांडवलदाराने यात गुंतवणूक केली आहे. या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मालिका ग्राहकांना मोफत आणि पैसे भरून उपलब्ध आहेत. यातील मोफतच्या पर्यायामध्ये व्हिडीओज पाहात असताना मध्ये जाहिराती झळकतात. या जाहिरातींचे पैसे कंपनीला मिळतात. याचबरोबर जर ग्राहकाने पैसे भरून नोंदणी केली तर ते पैसे थेट कंपनीचे उत्पन्न होते. तसेच यामध्ये ‘पे पर व्ह्य़ू’ असा पर्यायही आहे. यामुळे जर एखादा व्हिडीओ पाहायचा असेल तर त्याचे पैसे भरून तो व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. यातूनही कंपनीला उत्पन्न होत असते असेही शहाणे यांनी नमूद केले.

भविष्यातील योजना

भविष्यात पैसे भरून नोंदणी करणाऱ्या ग्राहकांसाठी दरमाह एक नवी मालिका देण्यात येणार आहे. याचबरोबर मोफत सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना चार नव्या मालिका देण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच आणखी नव्या चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही शहाणे म्हणाले.

नवद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना सुरुवातीपासून उत्पन्न कसे होईल याचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही त्याचा विचार करत नाहीत तोपर्यंत तुमचा व्यवसाय जास्त काळ तग धरून राहू शकत नाही. गुंतवणुकीवर फार अवलंबून न राहता उत्पन्नाकडे लक्ष द्यावे असा महत्त्वाचा सल्ला शहाणे यांनी नवउद्यमींना दिला आहे.

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:24 am

Web Title: web tv producer
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : कलाकृतींमध्ये ‘समृद्ध अडगळ’
2 शेख हत्येप्रकरणातील पुरावे सादर करण्याचे आदेश
3 मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई 
Just Now!
X