‘महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघा’तर्फे  वेबिनारचे आयोजन

मुंबई : शाळेच्या पाठय़पुस्तकातील धडे आणि कविता परीक्षेपुरत्या न वाचता विद्यार्थ्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी, यासाठी एक उपक्रम सध्या राज्यभरातील मराठी शाळांसाठी राबवला जात आहे. पाठय़पुस्तकाच्या संदर्भग्रंथांचे साहित्यिक आणि शिक्षक, विद्यार्थी यांना थेट जोडण्यासाठी ‘महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघा’तर्फे  गेल्या आठवडय़ाभरापासून वेबिनार आयोजित के ले जात आहेत. यात साहित्यिक आणि पाठय़पुस्तक निर्मिती मंडळातील सदस्य मार्गदर्शन करतात. हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

इयत्ता नववी-दहावीच्या मराठी विषयाच्या पाठय़पुस्तकांतील रोज एक धडा किं वा कविता निवडून त्याच्या लेखक किं वा कवींना निमंत्रित के ले जाते. त्यामुळे संबंधित लेखनाची पार्श्वभूमी, त्यामागील भूमिका, मूल्ये यांची माहिती प्रत्यक्ष साहित्यिकांच्या तोंडून ऐकता येते. जे साहित्यिक सध्या हयात नाहीत, त्यांच्याऐवजी त्यांच्या लेखनाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती मार्गदर्शन करतात. पाठय़पुस्तक निर्मिती मंडळातील सदस्य संबंधित लेखनाचा पाठय़पुस्तकात समावेश करण्यामागील भूमिका समजावून सांगतात, अशी माहिती शिक्षक संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल बोरनारे यांनी दिली.

‘‘आपल्या भाषेविषयी प्रेम असायलाच हवे, मात्र दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नये. भाषा आपल्याला संस्कृतीशी जोडते, दुसऱ्याचे मन वाचायला शिकवते,’’ अशी भूमिका ‘बोलतो मराठी’ पाठाच्या लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी मांडली. लेखक महेंद्र कदम यांनी ‘आजी : कु टुंबाचं आगळ’ या पाठातील ग्रामसंस्कृतीवर भाष्य के ले. तसेच ‘आगळ’ कादंबरीच्या निर्मितीची गोष्ट सांगितली. संत रामदास यांच्या ‘उत्तमलक्षण’ या अभंगातील भाव प्राचार्य गणेश देशपांडे यांनी उलगडला. कवयित्री नीरजा यांनी आपल्या ‘आश्वासक चित्र’ या कवितेतील स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य समजावून सांगताना जागतिक संदर्भही दिले.

‘साहित्यिकोंकडून थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे पाठांच्या थेट अंतरंगात शिरता येते. त्याचा गाभा, घटक, मूल्ये यांना स्पर्श करता येतो. लेखक किं वा कवीला त्या पाठातून नेमके  काय सांगायचे आहे हे उमगते. तसेच उपयोजन, व्याकरण, स्वाध्याय, इत्यादींविषयीही मार्गदर्शन मिळते’, असा अनुभव स्वामी विवेकानंद एज्युके शन सेंटर शाळेच्या शिक्षिका शलाका काळकर यांनी सांगितला.

सहभागी व्हायचे असल्यास..

या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास संपर्क  – अनिल बोरनारे – ९३२४७६४०३३. लिंक – शिक्षकांसाठी –  https://ezee.app/मराठी-शिक्षक-संघ- विद्यार्थ्यांसाठी –  https://ezee.app/मराठी-शिक्षक-संघ-मुंबई-Live-online