डांबराचे थर खरवडण्यासाठी साडेचौदा कोटींचा खर्च

मुंबई : वर्षांनुवर्षे टाकण्यात आलेल्या डांबराच्या थरामुळे अवजड होऊ लागलेल्या पुलांच्या खांबांवरील भार कमी करण्यासाठी मुंबईतील १६ ठिकाणचे पूल खरवडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेमार्गावरील पुलांवर वाढत्या भाराबद्दल केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी पालिका साडेचौदा कोटी रुपये खर्च करणार आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करताना गेल्या अनेक वर्षांत पालिकेने पुलांवरही डांबराचे व सिमेंट काँक्रीटचे थर टाकल्यामुळे पुलांवरील भार वाढतो आहे. त्यामुळे पूल कमकुवत होत असल्याचे आयआयटीने पालिकेला कळवले आहे. हे थर काढून टाकण्याची सूचना आयआयटीने पालिकेला केली आहे. त्यानुसार शहर भागातील एकूण १६ पूल खरवडून काढण्याचे पालिकेने ठरवले आहे. याबाबतचे वृत्त ‘दै. लोकसत्ता’ने ५ जुलै रोजीच दिले होते. त्यानुसार पालिकेने परिमंडळ १ व २ मधील एकूण १६ पूल खरवडण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्याला केवळ एक च प्रतिसाद आला असून ७ टक्के अधिक दराने कंत्राटदाराने बोली लावली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानुसार १६ पुलांवरील पृष्ठभाग खरवडून त्यावर नव्याने मास्टिक अस्फाल्टचे थर चढवण्यासाठी पालिका तब्बल १४ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या परवानगीनंतर हे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अंधेरीच्या पुलाची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेवरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर  आला होता. विविध कंपन्यांच्या उपयोगिता वाहिन्याच्या भारामुळे पुलाचा भाग पडल्याचे त्या वेळी आढळून आले होते. रेल्वे आणि आयआयटीने रेल्वेवरील पुलांची संरचनात्मक तपासणी केल्यानंतर अनेक पुलांवर अनावश्यक भार (डेड लोड) वाढत असल्याचे आढळून आले होते. हा भार कमी करण्याच्या सूचना आयआयटीने पालिकेला दिल्या आहेत. या पुलांवर जुन्या जलवाहिन्या, विजेच्या वाहिन्या तसेच अन्य उपयोगिता वाहिन्यांचा प्रचंड भार आहे. यापैकी वापरात नसलेल्या वाहिन्या काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आधी थरांवर खर्च, आता खरवडण्यावर..

या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी आणि ते गुळगुळीत करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र हे थर चढवताना शास्त्रशुद्ध पद्धतीने काम न केल्यामुळे वर्षांनुवर्षे या थरांची उंची वाढतच गेली आहे. पुलांवर वेळोवेळी डांबरांचे, कधी पेव्हर ब्लॉकचे थर चढवण्यात आले आहेत. त्यामुळे थर काढण्यासाठी आता पालिकेला कोटय़वधी खर्च करावे लागणार आहेत.

या स्थानकांवरील पूर खरवडणार

महालक्ष्मी, प्रभादेवी (कॅरोल पूल), दादर (टिळक पूल), चिंचपोकळी (उत्तर दिशेकडील पूल), करी रोड (उत्तर दिशेकडील पूल), वडाळा (नाना फडणवीस पूल), जीटीबी, माटुंगा (टी. एच. कटारिया पूल), मुंबई सेंट्रल (बेलासिस पूल), भायखळा, ग्रँट रोड, गँट्र रोड-चर्नी रोडदरम्यानचा केनेडी पूल, डायना पूल, फ्रेंच पूल, मरिन लाइन्स (प्रिन्सेस स्ट्रीट), सँडहर्स्ट रोड