बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविरोधातील वक्तव्यामुळे सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज (मंगळवार) मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींचे जंगी स्वागत करण्यात आले. पण यामध्ये लक्ष वेधले ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी जागोजागी लावलेल्या बॅनर्सनी. संजय निरूपम यांनी बॅनर्सवर भारताच्या भावी पंतप्रधानाचे हार्दिक स्वागत असा संदेश लिहिला आहे. निरूपम यांच्या या बॅनर्सची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या सर्व विरोधकांनी एकत्र आल्यास मोदींचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले होते. तसेच निवडणुकीनंतर एकमताने नेता निवडता येईल, असेही स्पष्ट केले होते. त्याचदरम्यान निरूपम यांच्या या बॅनरने पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून चर्चा रंगवण्यात येत असल्याचे दिसते.

राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने मोठी तयार केली होती. एक हजार रिक्षा चालकांनी त्यांचे स्वागत केले. भाजप सातत्याने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेत असल्याने त्यांचाच कित्ता काँग्रेसने गिरवण्यास सुरूवात केली. त्याच अनुषंगाने राहुल गांधी यांनी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राहुल गांधी मुंबईत येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

संजय निरूपम यांनी अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर त्यांनी ‘भारत के भावी पंतप्रधान का हार्दिक स्वागत’ असा संदेश या बॅनर्सवर लिहिला आहे.