संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ”बंगालच्या निवडणुकीचं एका शब्दात विश्लेषण करायचं असेल, तर बंगाल हा कम्युनिस्ट आणि काँग्रसेमुक्त या निवडणुकीमुळे झालेला आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निकालवर येत असलेल्या प्रतिक्रियांवरून देखील टिप्पणी केली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

फडणवीस म्हणाले, ”देशभरात ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांचे निकाल जे आज आले आहेत. मला आनंद आहे की, आसामध्ये पुन्हा आम्ही निवडून आलेलो आहोत. पुद्देचेरी हे दक्षिणेतील आणखी एक राज्य आम्हाला मिळालं आहे. तामिळनाडूत जे एकतर्फी दाखवलं जात होतं. तशी अवस्था नाही, आमची जी आघाडी आहे, तिला खूप चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चतपणे पश्चिम बंगालमध्ये आमच्या अपेक्षे अनुरूप जरी जागा आलेल्या नसल्या, तरी देखील तीन जागांवरून आम्ही मारलेली जी मजल आहे, ही देखील मोठी गोष्ट आहे. बंगालच्या निवडणुकीचं एका शब्दात विश्लेषण करायचं असेल, तर बंगाल हा कम्युनिस्ट आणि काँग्रसेमुक्त या निवडणुकीमुळे झालेला आहे. बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे आणि हिंदुत्ववादी विचाराणा जिथं केवळ डावे विचार होते, आता उजव्या विचाराणा भक्कम पाया हा बंगालमध्ये लाभला आहे.”

तसेच, ”मला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आज मी महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहतोय, दुसऱ्याच्या घरी मूल जन्मल्यानंतर इतकी मिठाई वाटत आहेत आणि इतके ढोल वाजवत आहेत, म्हणजे बेगानी शादी मै अब्दुला दिवाणा.. हे ऐकलं होतं, पण आज ते पाहायला देखील या ठिकाणी मिळत आहे. खरंतर काँग्रेसची अवस्था काय झाली? हे आपण या ठिकाणी बघितलं. शिवसेनेचं तर काही अस्तित्वचं नाही. राष्ट्रवादी आजच हरलेली आहे. पण जणू काही ममता दीदी त्या ठिकाणी जिंकल्या म्हणजे देशभरात तेच जिंकले आहेत, अशाप्रकारचा जो अविर्भाव आणला जातोय, तो अविर्भाव मला असं वाटतं की सर्वांना समजतो. बंगालच्या निवडणुकीमुळे एकच गोष्ट चांगली झाली, की आता ईव्हीएम बद्दल कुणी बोलणार नाही.” असंही यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.