विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या फुकटय़ा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. नोव्हेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेने धडक कारवाई करत विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन लाखांहून अधिक प्रवाशांना दंड ठोठावला. या दंडाची रक्कम साडेआठ कोटी एवढी आहे.
ऑक्टोबर महिन्यातही पश्चिम रेल्वेने एक आठवडाभर अंधेरी, बोरिवली आणि विरार या स्थानकांवर ‘जागता पहारा’ ठेवत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. नोव्हेंबर महिन्यात या कारवाईला अधिक व्यापक स्वरूप देत पश्चिम रेल्वेने सर्व स्थानकांवर तिकीट तपासनीसांच्या साहाय्याने महसूल बुडवणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावला.
या कारवाईत दोन लाख तीन हजार ३८६ विनातिकीट प्रवासी सापडले. या प्रवाशांमध्ये विनातिकीट प्रवास करण्याबरोबरच रेल्वेतून घेऊन जाण्यास मनाई असलेले सामान नेणाऱ्या प्रवाशांचाही समावेश आहे. दुसऱ्याच्या नावावर असलेले आरक्षित तिकीट वेगळ्याच प्रवाशाने वापरण्याच्या ९३७ घटना महिनाभरात घडल्या. या घटनांमध्ये आठ लाख ५५ हजार ८१० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या दंडाच्या रकमेत ६.८६ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.