रोजची प्रवासी संख्या ३ लाखांच्या वर गेलेले पहिले स्थानक

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर बोरिवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. बोरिवली स्थानकातील रोजची सरासरी प्रवासी संख्या २०१७-१८ मध्ये २ लाख ९३ हजार २२२ होती, ती २०१८-१९ मध्ये ३ लाख ५ हजार ६७० इतकी झाल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

२०१८-१९ मध्ये पश्चिम रेल्वेवर दररोजची प्रवासी संख्या तीन लाखांच्या पुढे गेलेले बोरिवली हे पहिले स्थानक ठरले आहे. त्याखालोखाल अंधेरी स्थानकातील रोजची प्रवाशांची संख्याही २ लाख ५४ हजार ९६१ पर्यंत पोहोचली आहे.

पश्चिम रेल्वेवरील मुंबई शहरातील स्थानकांची प्रवासी संख्या ही उपनगरीय स्थानकांच्या तुलनेने कमीच आहे. शहरात घरे परवडत नसल्याने अनेकांनी उपनगराकडे धाव घेतली. यात अंधेरीपासून पुढे घरांचा पर्याय निवडला. मात्र कालांतराने अंधेरी ते बोरिवलीपर्यंतही घरांचे गगनाला भिडलेले भाव पाहता त्यानंतर विरापर्यंत स्थलांतर झाले. त्यातच व्यवसाय, खासगी व सरकारी कार्यालयेही स्थलांतर झाल्याने डहाणू, विरार येथून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत गेली.

२०१७-१८ मध्ये पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३५ लाख ५७ हजार ३६६ एवढी होती. हीच संख्या २०१८-१९ मध्ये ३५ लाख ८८ हजार एवढी झाली आहे.

बोरिवलीत प्रवासी संख्या वाढण्यामागील नेमके कारण रेल्वे अधिकारी सांगू शकले नाहीत. घरांचे भाव गगनाला भिडले असले तरीही या ठिकाणी अनेकांनी गेल्या काही वर्षांत स्थलांतर केले आहे. मुंबईतील वाढलेली वाहतूक कोंडी हे कारणही त्यामागे असू शकते. गेल्या दोन वर्षांत रस्त्यांची अनेक कामे सुरू असून त्यामुळेच बहुधा प्रवासी लोकलकडे वळल्याचा अंदाज बांधला जात आहे.

उत्पन्नात वाढ

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. २०१७-१८ मध्ये दररोज सरासरी २३ लाख ७७ हजार ८२० रुपये उत्पन्न मिळाले असताना २०१८-१९ मध्ये हा आकडा २४ लाख ७० हजार ६३९ पर्यंत गेला आहे.

विरारमध्येही प्रवाशांत वाढ

विरार स्थानकातून २०१७-१८ मध्ये दररोज २ लाख १७ हजार ५०२ प्रवासी प्रवास करत होते. आता ही संख्या २ लाख ३९ हजार ३२९ पर्यंत पोहोचली आहे.