पश्चिम रेल्वेमार्गावर सुरू झालेल्या वातानुकूलित लोकल गाडीतून सध्याच्या भाडेदरावरच प्रवास करण्याची मुभा प्रथम श्रेणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. मात्र तसे करणे शक्य नसल्याने अखेर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडे आणि वातानुकूलित लोकल गाडीच्या भाडेदरांतील फरक आकारून प्रथम श्रेणी प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तशी मंजुरी रेल्वे मंडळाकडून देण्यात आली आहे. हा फरक सध्याच्या प्रथम श्रेणी पास आणि तिकिटावर आकारण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मात्र या निर्णयाचा दिलासा प्रथम श्रेणी प्रवाशांना काहीएक होणार नसून फरक वसूल केल्याने भाडे हे वातानुकूलित लोकल भाडे दराएवढेच होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी दिली.

२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल गाडी धावली. सध्या या लोकल गाडीच्या १२ फेऱ्या चर्चगेट ते बोरिवली, विरापर्यंत होत आहेत. वातानुकूलित लोकल गाडीचे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलपर्यंतचे तिकीट ६० रुपये आणि विरापर्यंत २०५ रुपये आणि महिन्याचा पास अनुक्रमे ५७० रुपये आणि २,०४० रुपये आहे. सध्याच्या प्रथम श्रेणीच्या पासापेक्षा किती तरी पट्टीने वातानुकूलितचे भाडे जास्त असल्याने ते सर्वसामान्यांबरोबरच प्रथम श्रेणी प्रवाशांनाही परवडणारे नाही.  सामान्य लोकल गाडीचे प्रथम श्रेणी प्रवासी मात्र वातानुकूलित लोकल गाडीतून त्याच तिकीट आणि पासावर प्रवास करत होते. अशा प्रकारचा प्रवास करण्याची परवानगी असल्याचा गैरसमज झालेल्या प्रथम श्रेणी प्रवाशांना  दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे वातानुकूलित लोकल गाडीतून सध्याचा भाडेदरावरच प्रवास करण्याची मागणी प्रथम श्रेणी प्रवासी करत होते.

ही मागणी लक्षात घेता वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करण्याची इच्छा असलेल्या प्रथम श्रेणी प्रवाशांसाठी एक वेगळी भाडेरचना करण्यात आली आणि त्याला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.