पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात कॅशलेस अर्थव्यवस्थेवर भर देण्यात आला. सगळीकडेच रोख रकमेऐवजी डेबिट-क्रेडिट कार्ड, पेटीएम, यूपीआयसारख्या विविध इ-पेमेंटला चालना देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेनेही तिकिट बुकिंगच्या ठिकाणी पाँईट ऑफ सेल (पीओएस) मशीनने पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय झाली. परंतु, रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे एका रेल्वे प्रवाशाला तब्ब्ल १ लाख ३३ हजाराचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या बुकिंग क्लार्कने नजरचुकीने प्रवाशाच्या क्रेडिट कार्डमधून १३३३.३० ऐवजी १,३३,३३० रूपये घेतले. आता हे पैसे मिळवण्यासाठी त्या प्रवाशाला रेल्वे कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

विकास मंचेकर हे लोकल रेल्वेचे नियमित प्रवासी आहेत. दि. ४ ऑगस्ट रोजी ते आपला फर्स्ट क्लासचा तिमाही पास काढण्यासाठी पश्चिम बोरिवलीतील बुकिंग काऊंटरवर गेले. त्यांना पाससाठी १,३३३.३० रूपये द्यायचे होते. त्यांनी बुकिंग क्लार्कला आपल्याकडील क्रेडिट कार्ड दिले. बुकिंग क्लार्कने पीओएस मशीनवर कार्ड स्वाइप करताना १३३३.३० ऐवजी चक्क १,३३,३३० रूपये टाकल्याचे मंचेकर यांनी सांगितले. आता माझे पैसे परत मिळवण्यासाठी मी आता रेल्वे कार्यालयात चकरा मारत असल्याचे ते म्हणाले.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी लगेच लेखी तक्रारही दिली. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

मंचेकर यांच्या चिंतेत आता आणखी एक भर पडली आहे. त्यांच्या क्रेडिट कार्डची अंतिम तारीख ही २४ ऑगस्ट आहे. त्यापूर्वी जर रेल्वेने त्यांचे पैसे परत दिले नाही तर त्यांना नाहक ४ ते ५ हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. बँकेने व्याजाची मागणी केल्यास रेल्वेने व्याजासह ही रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मंचेकरांनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला असून मुंबई सेंट्रल येथे असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातही ते जाऊन आले आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी संबंधित क्लार्कवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्याचे सांगत याप्रकरणी त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आल्याचे म्हटले.

रेल्वेने कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत मंचेकर यांनी व्यक्त केले. रेल्वे बुकिंग काऊंटरवर पीओएसमधून पैसे काढताना ग्राहकाला रक्कम दाखवूनच मग त्याला त्याचा गोपनीय क्रमांक टाकण्यास सांगावे. पिन क्रमांक टाकण्यापूर्वी ग्राहकाला रक्कम समजल्यास अशा प्रकारच्या चुका होणार नसल्याचे त्यांनी निर्दशनास आणून दिले.