पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या उमरोळी या ठिकाणी रेल्वे फाटकाजवळ रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना त्रास होतो आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पालघरजवळ असलेल्या उमरोळी या ठिकाणी रेल्वे फाटकाजवळ रुळाला तडे गेले. ज्यानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक मंदावली.

शनिवार असला तरीही मुंबईकरांची कामावर जाण्याची घाई संपलेली नसते. अशात पश्चिम रेल्वेवरची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु असल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना ट्रेन लेटचाही त्रास सहन करावा लागतो आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरा सुरू असूनही जादा बसेस किंवा कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे आधीच गर्दी असलेल्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर जास्तच गर्दी झाली आहे आणि या गर्दीला तोंड देतच मुंबईकरांना ऑफिस गाठावे लागते आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळताच या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.