फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या महिलेच्या प्रेमात पडणं पश्चिम रेल्वेच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. महागड्या भेटवस्तू पाठवत असून कुरिअर आणि कस्टम ड्युटी भरण्याचा बहाणा करत महिलेने ६९ वर्षीय पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्याला २७ लाखांचा गंडा घातला आहे. सायबर क्राइमला बळी पडत महिलेच्या नादात पीडित व्यक्तीने आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मिरा रोडमधील नया नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६९ वर्षीय पीडित व्यक्ती विवाहित असून आपल्या पत्नीसोबत राहतात. २००७ साली पश्चिम रेल्वेतून मुख्य निरीक्षक म्हणून ते निवृत्त झाले. गतवर्षी मे महिन्यात फेसबुकवर जेनी विल्यिअम नावाच्या एका महिलेच्या ते संपर्कात आले. महिलेने आपण कॅनडाचे नागरिक असून युकेमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत असल्याचं आपल्या प्रोफाइलमध्ये लिहिलं होतं. पीडित व्यक्तीने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्विकारली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘फेसबुकवर काही वेळ चॅटिंग झाल्यानंतर जेनीने आपला फोन नंबर पीडित व्यक्तीसोबत शेअर केला होता. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ती नेहमी रोमँटिक मेसेज पाठवत असे, तसंच व्हॉट्सअॅपवर फोटोही पाठवायची. फोटोवरुन महिला जवळपास ३५ वर्षांची असावी असा अंदाज आहे’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

एका चॅटिंगदरम्यान जेनीने पीडित व्यक्तीला आपण कुरिअरच्या माध्यमातून एक गिफ्ट पाठवत असून त्यात लॅपटॉप, आयफोन आणि चेक असेल असं सांगितलं होतं. जेनीने व्हॉट्सअॅपवर भेटवस्तूचे फोटोही पाठवले होते. पीडित व्यक्तीने सांगितल्यानुसार, अनेकदा रात्रभर ते चॅटिंग करत असतं. आपण तिच्या प्रेमात पडले होतो अशी कबुली पीडित व्यक्तीने पोलिसांकडे दिली आहे.

गतवर्षी मे ते सप्टेंबर दरम्यान जेनीने कुरिअर, कस्टम ड्यटी अशी अनेक कारणं सांगत पैसे पाठवण्यास सांगितलं. पीडित व्यक्तीने तिच्यावर विश्वास ठेवत वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवले. यामधील काही पैसे त्यांच्या पत्नीचे होते. जेनीने पीडित व्यक्तीला आपण युकेमध्ये मोठं घर घेतलं असून, आपल्यासोबत तिथे शिफ्ट व्हा असं सांगत विश्वास जिंकला होता असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पण काही दिवसांनी जेनीने संपर्क कमी केला आणि पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं. अखेर १४ जून रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या रॅकेटमध्ये अनेकजण सहभागी असावेत असा संशय आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी दिली आहे.