गेले आठ महिने केवळ चाचणी सुरू असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात उल्लेख झालेल्या नवीन ७२ गाडय़ा मुंबईत कधी येणार आणि उपनगरीय फेऱ्यांमध्ये वाढ कधी होणार, याची उत्कंठा मुंबईकरांना लागून राहिली आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर बंबार्डिअर कंपनीच्या या नव्या गाडय़ा आल्या, तरीही या मार्गावरील एकही फेरी वाढवणे शक्य नसल्याचे खुद्द महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नव्या गाडय़ा आल्यावर सध्याच्या जुन्या गाडय़ा हद्दपार होण्यापलीकडे काहीच फायदा होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या गर्दीच्या वेळेत दर तीन मिनिटांनी एक गाडी आहे. मात्र हे प्रमाण धीमी आणि जलद अशा दोन्ही गाडय़ा मिळून आहे. नवीन बंबार्डिअर कंपनीच्या ७२ गाडय़ा मुंबई उपनगरीय सेवेसाठी येणार आहेत. यापैकी बऱ्याच गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातही दाखल होणार आहेत. मात्र या गाडय़ा आल्या, तरी पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही, असे हेमंत कुमार यांनी सांगितले. सध्या पश्चिम रेल्वेवर १३००हून जास्त फेऱ्या आहेत. पाच वर्षांपूर्वी ही संख्या ७००च्या आसपास होती. म्हणजेच पाच वर्षांत पश्चिम रेल्वेवर दुपटीने फेऱ्यांची संख्या वाढली आहे.
स्वयंचलित दरवाज्यांची लोकल लवकरच
उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची घोषणा पश्चिम रेल्वेवर येत्या तीन ते चार महिन्यांत अमलात येणार आहे. स्वयंचलित दरवाज्यांचे तंत्रज्ञान नवीन नसल्याने ही प्रक्रिया सोपी आहे. मात्र दरवाजे बंद झाल्यावर गाडीमध्ये हवा खेळती कशी राहील, याबाबतचे संशोधन सुरू असून लवकरच लोकल गाडी प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित दरवाजांनिशी धावताना दिसेल, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले.