जुन्या लोकल कालबाह्य़ होण्यापूर्वीच आगमन

मुंबईकरांचा उपनगरीय प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने बम्बार्डियर पद्धतीच्या १५ नवीन लोकल गाडय़ा आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात (आयसीएफ) बांधण्यात येतील. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या धावत असलेल्या नऊ लोकल कालबाह्य़ होण्याची शक्यता असल्याने त्याआधीच नवीन गाडय़ांची भरती करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंतच्या प्रवाशांसाठी नोव्हेंबरपासून नवीन उपनगरीय लोकलचे वेळापत्रक लागू केले. या वेळापत्रकानुसार ३२ नवीन फेऱ्यांची भर पडली. त्यामुळे एकूण एक हजार ३२३ फेऱ्यांची असलेली संख्या एक हजार ३५५ पर्यंत पोहोचली. सध्या ताफ्यात असलेल्या १०० लोकलमधूनच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजचे १०० लोकलपैकी ८६ लोकलच प्रत्यक्षात धावतात. तर अन्य लोकल टप्प्याटप्प्यात देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये जातात. पश्चिम रेल्वेकडे सिमेन्स, एमयूटीपी दोनमधील बम्बार्डियर आणि मेधा, रेट्रोफिटेड तसेच ऑलस्टॉम प्रकारातील लोकल आहेत. यामध्ये सर्वात जुन्या अशा नऊ रेट्रोफिटेड लोकल कालबाह्य़ होत आल्या आहेत.

या लोकल पूर्णपणे निरुपयोगी किंवा चालवण्यास अयोग्य होण्याआधीच १२ डब्यांच्या १५ नवीन लोकल आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली.

एकंदरीत पश्चिम रेल्वेवरील लोकलची संख्या पाहिल्यास मध्य रेल्वेच्या तुलनेत फार कमी असल्याचे दिसते. मध्य रेल्वेकडे १४५ लोकल असून प्रत्यक्षात १२२ लोकल धावतात. या परिस्थितीनंतर पश्चिम रेल्वेने १५ नवीन लोकल ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बम्बार्डियर प्रकारातील असलेल्या लोकल चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात बांधल्या जाणार आहेत. लवकरच त्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे जैन म्हणाले.

फेऱ्या वाढणार?

मध्ये रेल्वेकडून नवीन लोकल फेऱ्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्या जातानाच कमी लोकलच्या संख्येमुळे फेऱ्या वाढविण्याची अडचण पश्चिम रेल्वेवर आहे. त्यामुळे नवीन लोकल दाखल झाल्या तर भविष्यात आणखी काही फेऱ्या वाढू शकतील, अशी आशा पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. मध्य रेल्वेवर भारतीय तंत्रज्ञान असलेल्या चार मेधा लोकल दाखल होणार होत्या. परंतु या लोकलही पश्चिम रेल्वेवर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या दोन मेधा लोकलची संख्या थेट सहावर पोहोचेल.

पश्चिम रेल्वेवरील लोकलची सद्य:स्थिती

प्रकार                                                  संख्या

सिमेन्स                                               १३

एमयूटीपी अंतर्गत- बम्बार्डियर            ७२

– मेधा                                                   २

रेट्रोफिटेड                                             ९

ऑलस्टॉम                                            ४