मुंबईत लोकल प्रवाशांमध्ये रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे यावर नेहमीच चर्चा रंगते. मध्य रेल्वे चांगली की पश्चिम रेल्वे यावर वादविवादही होतात. आता मात्र थेट मुंबई हायकोर्टानेच या दोन्ही मार्गांविषयी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सध्याच्या काळात पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या मुली मध्य रेल्वेवरील मुलांना लग्नासाठी पसंती देत नाही असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

रेल्वेमधील सुरक्षेसंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबई पोलीस, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्या. नूतन सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान हायकोर्टाने पश्चिम रेल्वे विरुद्ध मध्य रेल्वे या वादावर मत मांडले. चर्चगेटवरुन मध्य रेल्वे का चालवत नाही असा प्रश्न हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर पश्चिम रेल्वेने सांगितले, चर्चगेटहून परळपर्यंत नवीन रेल्वे रुळ टाकायला जागाच नाही. त्यामुळे चर्चगेटवरुन मध्य रेल्वेसाठी लोकल सुरु करणे अशक्य असल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पुलांवर अतिक्रमण करणा-या फेरीवाल्यांवर कडक कारवाई का होत नाही असा प्रश्नही हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला विचारला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, दररोज ८० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात याकडेही हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. रेल्वे प्रवाशांची संख्या युरोपातील एखाद्या देशाइतकी असल्याचे कोर्टाने सांगितले.

रेल्वे अपघातात मृत्यू होणा-या प्रवाशांच्या प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाली. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये २१ ते ४० वर्ष वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. फाजिल आत्मविश्वास अपघातांना निमंत्रण देतो असे प्रशासनाने आवर्जून नमूद केले. गेल्या २ वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणा-यांची संख्या कमी असल्याचा दावा लोहमार्ग पोलिसांनी केला.