उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या नव्या गाडीचे स्वप्न पूर्ण करणारी चौथी बंबार्डिअर गाडी मंगळवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेवर दाखल झाली. चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत तयार झालेली ही गाडी आल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स कंपनीची एक गाडी मध्य रेल्वेवर येणार असल्याने मध्य रेल्वेवरील एक कालबाह्य़ गाडी कायमस्वरूपी निकालात निघेल. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही दिलासा मिळेल. मात्र या गाडीच्या काही चाचण्या झाल्यानंतरच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या ‘एमयूटीपी-२’ योजनेअंतर्गत ७२ नव्या गाडय़ा उपनगरीय रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी ४० गाडय़ा मध्य रेल्वेकडे आणि ३२ गाडय़ा पश्चिम रेल्वेकडे सोपवण्याची योजना होती. मात्र त्यात बदल होऊन आता सर्व ७२ गाडय़ा पश्चिम रेल्वेवरच चालणार आहेत. त्यापैकी तीन गाडय़ा याआधीच पश्चिम रेल्वेवर आल्या असून त्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. तर डिसेंबर २०१६पर्यंत उर्वरित सर्व गाडय़ा टप्प्याटप्प्याने येणे अपेक्षित आहे.
त्यापैकी चौथी गाडी मंगळवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेकडे आली. या गाडीच्या वेगाच्या, ब्रेक प्रणालीच्या चाचण्या आता घेण्यात येतील. या चाचण्यांनंतर पुढील तीन ते चार दिवसांत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. प्रवाशांनी सुचवलेल्या बदलांनुसार बनवलेली ही दुसरी गाडी असून या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.