सहा डब्यांच्या अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीला पश्चिम रेल्वेचा नकार

मुंबई : बारा डब्यांच्या सामान्य लोकलचे सहा डबे वातानुकूलित करून त्याची चाचणी घेण्यावर रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब केल्यानंतरही जादा वातानुकूलित डब्यांमुळे प्रवाशांचा रोष ओढवण्याच्या भीतीने पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे ही चाचणी घेण्यास पश्चिम रेल्वेने असमर्थता दर्शवली आहे. नऊ डबे सामान्य आणि तीन डबे वातानुकूलित अशी बारा डब्यांची अर्ध वातानुकूलित लोकल हवी, अशी भूमिका पश्चिम रेल्वेने घेतली आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अर्ध वातानुकूलित लोकल चालविण्याचे आदेश दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने तीन प्रस्ताव रेल्वेबोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवले होते. त्यामध्ये बारा डब्यांच्या लोकलमध्ये सहा डबे वातानुकूलित करण्याच्या प्रस्तावाखेरीज, नऊ डबे सामान्य आणि तीन डबे वातानुकूलित हा प्रस्तावदेखील होता. तसेच पंधरा डबा लोकलमध्ये नऊ डबे सामान्य व सहा डबे वातानुकूलित ठेवता येतील, असेही पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुचवले होते. त्याचवेळी बारा डब्यांच्या गाडीत तीन डबेच वातानुकूलित ठेवावेत, अशी मागणी पश्चिम रेल्वेने केली होती. परंतु,  रेल्वे बोर्ड, रिसर्च डिजाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने बारा डब्यांपैकी सहा डबे वातानुकूलित प्रस्तावालाच मंजुरी दिली व त्याची चाचणी करण्याच्या सूचना केल्यानंतर पश्चिम रेल्वेने तयारीही दर्शवली.

असे असले तरी, बारा डब्यांच्या लोकलमध्ये निम्मे डबे वातानुकूलित राहिल्यास प्रवाशांचा त्याला विरोध होईल व त्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल, अशी भीती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळेच पहिल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही वातानुकूलित लोकलच्या चाचणीला सुरुवात होऊ शकली नाही.

नऊ-तीन अशा बारा डब्यांच्या अर्ध वातानुकूलित लोकलच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी  मागणी पश्चिम रेल्वे प्रशासन करीत आहे. मात्र त्यास रेल्वे बोर्ड तयार नाही. याच मुद्दय़ावरून रेल्वे बोर्ड आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाची या आठवडय़ात दिल्लीत बैठकही होणार आहे.  त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

सहा-सहा डब्यांची अर्ध वातानुकूलित लोकल नको, अशी भूमिका पश्चिम रेल्वेची आहे. त्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंका आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरही चाचणी होऊ शकलेली नाही. नऊ-तीन डब्यांची वातानुकूलित लोकल हवी, अशी नवीन मागणी असून त्यासाठी रेल्वे बोर्डासोबत बैठक होणार आहे.

– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे