रेल्वेतील पन्नास टक्के अपघात हे प्रवासी लोकलमधून खाली पडून होतात. अपघातांचे हे गंभीर प्रमाण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेवर स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल रविवारपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी लोकलमधील या स्वयंचलित दरवाज्यांची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली. महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हे दरवाजे बसवण्यात आले असून रविवारपासून ही लोकल नियमितपणे पश्चिम रेल्वेवर धावणार आहे.
चर्चगेट ते बोरिवली या मार्गावर ही लोकल धावणार असून महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्याला हे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. हे स्वयंचलित दरवाजे यशस्वीरीत्या उघडबंद होत आहेत, याची खातरजमा के ल्यानंतर आता ही लोकल नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाजांचे वैशिष्टय़ म्हणजे दरवाजे पूर्ण बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नाही. ज्या दिशेला स्टेशन येईल त्या दिशेचा दरवाजा उघडला जाईल, अशी सोय करण्यात आली असून याचे सगळे नियंत्रण गार्डकडे राहणार आहे. शिवाय, दरवाजा उघडबंद होण्यासाठी अवघे पाच सेकंद लागणार असल्याने गाडीच्या वेळापत्रकावर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर अशा ८ स्वयंचलित दरवाजांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एका डब्यासाठी ६ लाख रुपये खर्च येतो. सर्वच लोकल्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठी १००० कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्या आठच लोकलमध्ये हे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. रविवारपासून धावणाऱ्या या लोकलमध्ये रेल्वेच्या महिला कर्मचारीही प्रवास करणार असून एकूण प्रवाशांचा अनुभव लक्षात घेऊन त्यात योग्य ते बदल केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.