पश्चिम रेल्वेकडून पादचारी पुलांवर चुकीचे शब्दप्रयोग

‘कृपया लहान चेंडू घेऊ नका, कृपया घसरणारी बुटे वापरु   नका’ असे पादचारी पुलांवरील संदेश वाचून सध्या प्रवाशांना हसूच फुटत आहे. पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकातील पादचारी पुलांवर रेल्वे प्रशासनाकडूनमराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेतून संदेश लिहिण्यात आले आहेत. मात्र चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आल्याने हे संदेश प्रवाशांच्या समजण्यापलीकडे गेले आहेत. यातून पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे तर नाही ना असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेकडून सुरक्षेच्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये नवीन पादचारी पूल बांधतानाच सध्याच्या पुलांवर जनजागृतीचा भाग म्हणून संदेशही लिहिण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. गर्दीच्या स्थानकांवरील पादचारी पुलांच्या पायऱ्यांवर संदेश देणारे तीन भाषेतील रंगीत स्टिकर लावण्यात आले आहेत. पादचारी पुलाचा वापर करताना प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे, याबाबत माहिती देणारे संदेश आहेत. मात्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा मराठीत अनुवाद करताना तो शब्दश: केल्याने प्रवाशांनाही लिहिण्यात आलेले संदेश पाहून हसूच फुटत आहे.

भाषांतर हास्यास्पदच..

‘प्लीज डू नॉट टेक शॉर्टकट’चा अर्थ ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’, असा नमूद करण्यात आला आहे. ‘प्लीज होल्ड द हॅण्डरेल’चा मराठी अनुवादही ‘कृपया हॅंड्राईल धरून ठेवा’ असे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘कृपया एक पाऊल वगळू नका’, ‘कृपया घसरणारी बुटे वापरु नका’ आणि ‘कृपया एकतर बाजूला ठेवा’, अशी अनेक मराठी वाक्ये संदेशात असल्याने हे करण्यामागे कोणते तर्क लावण्यात आले, हेच  कळत नाही.