अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाटय़ांवर होणारा विसर्जन सोहळा आटोपून रात्री उशीरा घरी परतणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेने रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान लोकलच्या आठ सेवा चालविण्यात येणार आहेत.

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव, जुहू, दादर आदी चौपाटय़ांवर गणेश विसर्जन सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. रात्री उशीरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू असतो. त्यामुळे दूूरवर राहणाऱ्या भाविकांना घरी पोहोचता यावे म्हणून यंदा पश्चिम रेल्वेने रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट येथून विरारला जाण्यासाठी रात्री १.१५ वाजता पहिली विशेष लोकल सोडण्यात येणार असून ती २.४७ वाजता विरारला पोहोचेल. त्यानंतर १.५५ वाजता दुसरी, २.२५ वाजता तिसरी, ३.२० वाजता चौथी लोकल चर्चगेट येथून विरारला सोडण्यात येणार आहे. तसेच विरार येथून चर्चगेटला जाण्यासाठी पहिली लोकल ००.१५ वाजता सोडण्यात येणार असून ती मध्यरात्री १.४५ च्या सुमारास चर्चगेटला पोहोचेल. त्यानंतर विरार येथून ००.४५ वाजता दुसरी, १.४० वाजता तिसरी, २.५५ वाजता चौथी लोकल सोडण्यात येणार आहे. या लोकल चर्चगेट ते विरार दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. विसर्जन सोहळ्यावरुन परतणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.