*वॉटर कूलर यंत्रांची देखभाल व्यवस्थित नाही

*सेवाभावी संस्थेचा आणखी कूलर देण्यास नकार

सामाजिक संस्थांच्या मदतीने रेल्वेतील छोटय़ाछोटय़ा गोष्टी मार्गी लावण्याचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा मानस पश्चिम रेल्वेवर धुळीस मिळवला जात आहे. या रेल्वेमार्गावरील स्थानकांत प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यासाठी भारत र्मचट चेंबर्सने सामाजिक उत्तरदायित्वापोटी देऊ केलेल्या वॉटर कूलर्सची देखभाल करण्यात पश्चिम रेल्वे अपयशी ठरली आहे. त्यामुळे या संस्थेने आता यापुढील कूलर्स पश्चिम रेल्वेला देण्यास नकार दिला आहे. परिणामी आता पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना शुद्ध पाण्यासाठी ‘रेल नीर’वरच अवलंबून राहावे लागणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे खात्याचा कारभार हातात घेतल्यापासूनच रेल्वेस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तेथील प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारत र्मचट चेंबर्सला पत्र पाठवून सामाजिक उत्तरदायित्वापोटी चर्चगेट ते सुरत या स्थानकांत ५८ वॉटर कूलर्स देण्याची सूचना केली होती. भारत र्मचट चेंबर्सनेही या सूचनेला प्रतिसाद देत विविध स्थानकांत २६ कूलर्स बसवून दिले. तसेच उर्वरित ३२ कूलर्सही लवकरच बसवले जातील, असे सांगितले होते. आतापर्यंत हे २६ कूलर्स बसवण्यासाठी १४-१५ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र या कूलर्सची देखभाल-दुरुस्ती करण्यात पश्चिम रेल्वेने हयगय केल्याचे आढळल्यानंतर उर्वरित ३२ कूलर्स आपल्या संस्थेतर्फे बसवण्यात येणार नसल्याचे या संस्थेचे विश्वस्त राजीव सिंघल यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दशा..

सेवाभावी संस्थेने विविध स्थानकांत बसवलेल्या कूलर्सपकी भाईंदर स्थानकातील कूलरला रेल्वेतर्फे विद्युत पुरवठाच दिला गेलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वेने या कूलरला पाणी पुरवठाही उपलब्ध करून दिलेला नाही. मालाड, महालक्ष्मी, लोअर परळ या स्थानकांवरील कूलर्सचीही दुर्दशा झाली असून मरिन लाइन्स स्थानकावरील कूलरवरील देणगीदारांच्या नावावर चिकटपट्टी चिकटवून ते नाव झाकण्यात आले आहे. विविध स्थानकांवर बसवलेल्या या कूलर्सची दुर्दशा पाहून आता यापुढील ३२ कूलर्स न बसवण्याचा निर्णय भारत र्मचट चेंबर्सने घेतल्याचे सांगितले जात आहे.