मे महिन्यात दर दिवशी सेवेत १५ ते २० मिनिटे विलंब

आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेली पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा गेला महिनाभर दर दिवशी दिरंगाईने धावली होती. त्यामुळे प्रवाशांना दर दिवशीच त्रास सहन करावा लागला असला, तरी या दिरंगाईमागे मुंबईकरांच्या पुढय़ात वाढून ठेवलेल्या पावसाळ्याचे कारण असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वेमार्गावरील पावसाळी कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विविध ठिकाणी वेगमर्यादा घातली होती. या वेगमर्यादेमुळे गाडय़ांचा वेग मंदावल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले होते. आता पहिल्या टप्प्यातील ही कामे संपली असून जून महिन्यापासून गाडय़ा वेळेत धावतील, असा विश्वासही रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ, दादर, माहीम, अंधेरी आदी ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी दर वर्षी मे महिन्यात कामे केली जातात. यंदाही पश्चिम रेल्वेवर मे महिन्यात दादर, मरिन लाइन्स, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, अंधेरी येथे कामे सुरू होती. या कामांमध्ये मुख्यत्त्वे रुळांखालील खडी पूर्ण काढून ती चाळून पुन्हा टाकण्याचे काम करण्यात आले. भरपूर पाऊस पडल्यास पावसाचे पाणी खडीतून झिरपून जमिनीपर्यंत पोहोचावे यासाठी खडी साफ करण्याची गरज असते. त्यामुळे हे काम महत्त्वाचे मानले जाते, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

जूनमध्ये सेवा सुरळीत?

दुरुस्तीच्या कामांसाठी या स्थानकांदरम्यान ताशी ३० किमीची वेगमर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद तसेच धिम्या गाडय़ांचा वेगही कमी झाला. परिणामी या गाडय़ांच्या परिचालन वेळेत वाढ झाली. त्यामुळे या गाडय़ा नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मे महिन्यात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सहन करायला लागलेल्या दिरंगाईच्या मागे हे मुख्य कारण असल्याचेही भाकर यांनी स्पष्ट केले. पावसाळी कामांचा महत्त्वाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता जून महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सेवा सुरळीत चालतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.