जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पुकारलेला पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकातील बंद चार तासानंतर मागे घेतला आहे. या बंदमुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतून धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून संतप्त प्रवाशांनी आंदोलन पुकारले होते. अखरे चार तासानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी आल्यानंतर पोलिसांवर दगडफेकीचा प्रकारही घडला आहे. यामध्ये एक पोलिस जखमी झाला आहे. त्याला जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. नालासोपाऱ्यातील रेल रोकोमुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या असल्याचे वृत्त आहे.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज सकाळपासूनच रेल रोको केला.  नागरिकांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नालासोपाऱ्यातील दुकाने, रिक्षा तसेच वसई-विरार महापालिकेची बससेवाही स्थगित ठेवण्यात आली आहेत.

 

 

आज सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे मार्गावर उतरले आणि त्यांनी रेल्वेची वाहतूक रोखून धरली. दरम्यान, तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.