पश्चिम रेल्वेने मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबई आणि उपनगरांमधील प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. चर्चगेट ते विरार या मार्गावर महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबरपासून या फेऱ्या सुरु होतील. विरार ते चर्चगेटसाठी सकाळी ७.३५ ची लोकल रवाना होईल. तर संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट विरार लोकल चालवण्यात येईल.

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी नव्या दोन लेडिज स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. करोना प्रादुर्भाव होऊ नये आणि ट्रेन्समध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी लोकलमध्ये गर्दी होणं टाळायचं आहे. सध्या गर्दी होत असल्याने विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय इतर प्रवाशांना लोकलमध्ये अद्यापही प्रवेश नाहीच. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर कुणीही गर्दी करु नये असं आवाहन पुन्हा एकदा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलं आहे. तसंच लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर कुणीही विश्वास ठेवू नका असंही आवाहन करण्यात आलं आहे.