ऐन गर्दीच्या वेळी १००हून अधिक सेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

लोअर परळच्या कार्यशाळेतून एल्फिन्स्टन रोड यार्डात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीचा एक डबा मंगळवारी पहाटे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर घसरल्याने नऊ तास वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पश्चिम रेल्वेच्या तब्बल १००हून अधिक सेवा रद्द झाल्या.

सोमवारी मध्यरात्रीनंतर लोअर परळ कार्यशाळेतून लांब पल्ल्याच्या गाडीचे १४ डबे जवळच्या यार्डात नेले जात होते. लोअर परळ ते एल्फिन्स्टन रोड या स्थानकांदरम्यान ८०० मीटरच्या भागात या गाडय़ा डाऊन धिम्या मार्गावरून जातात. तेथेच या १४ डब्यांपैकी दुसरा डबा घसरून जवळच्या भिंतीवर आदळून अप आणि डाऊन धिम्या मार्गावर आडवा झाला. तो पुन्हा रुळावर आणण्यात आणि वाहतूक सुरू करण्यात नऊ तास गेल्याने सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना फटका बसला. गाडय़ा रद्द झाल्याने प्रत्येक स्थानकांवर आणि जलद गाडय़ांमध्ये प्रचंड गर्दी होती. पश्चिम रेल्वेने काही धिम्या गाडय़ा अंधेरी, माहीम आणि वांद्रे येथे थांबवून त्या पुन्हा चर्चगेटकडे फिरवल्या; तर काही गाडय़ा जलद मार्गावर वळवून चर्चगेटपर्यंत आणल्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळच्या वेळी अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती.

हा डबा नेमका कसा घसरला, याचा तपास करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती पुढील आठवडय़ात अहवाल सादर करील. मात्र प्राथमिक पाहणीत रेल्वे रूळांत कोणताही दोष नसल्याचे आढळले आहे. घसरलेल्या या डब्याचे आयुर्मान संपले होते आणि तो भंगारात काढला जाणार होता. त्यासाठीच तो यार्डमध्ये नेला जात होता. मात्र त्याच वेळी तो रूळांवरून घसरला. डब्याच्या चाकांमध्ये काही दोष आहे का, याचीही चाचपणी होणार आहे.

अपघात आणि मदतीचे वेळापत्रक..

  • रात्री २.१०च्या सुमारास डबा घसरला, पण त्यावेळी उपनगरी वाहतूक बंद असल्याने दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद होऊनही प्रशासनाकडे उसंत होती.
  • मात्र हा डबा उचलणारी क्रेन मध्य रेल्वेकडे होती. कुर्ला स्थानकाजवळ असलेली ‘अ‍ॅक्सिडण्ट रीलिफ ट्रेन’  (एआरटी)आणि क्रेन तब्बल तीन तासांनंतर पहाटे ५.०५ वाजता दादर येथे पश्चिम रेल्वेच्या ताब्यात आली.
  • एआरटी मागे घेऊन क्रेन पुढे घेण्यासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागला आणि अखेर सकाळी साडेसहाला क्रेन घटनास्थळी दाखल झाली.
  • सकाळी नऊ वाजता डबा पुन्हा रूळांवर चढवण्यात आला. तो बाजूला घेण्यात अर्धा तास गेला.
  • त्यानंतर अप आणि डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर पुन्हा लावण्याचे काम तासभर चालले.
  • अखेर अप धिमी वाहतूक १०.२७ वाजता आणि डाऊन धिमी वाहतूक ११.१० वाजता सुरू.