पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल स्थानकाजवळ यार्डात जाणाऱया एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून, चर्चगेटहून विरारकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर चर्चगेटच्या दिशने येणारी वाहतूक उशीराने सुरू आहे. एका मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना सकाळीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अपघातग्रस्त डबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने डबा हटविण्यात येत आहे.

परळ वर्कशॉपमधून यार्डात जाणाऱय़ा एक्स्प्रेसचा डबा सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास लोअर परेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ घसरला. त्यामुळे एलफिस्टन रोड, महालक्ष्मी आणि लोअर परेल येथील प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, धीम्यामार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली. अर्थात यामुळे जलद मार्गावरील ताण वाढला आहे. दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.