* मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या वाटय़ाला गारेगार प्रवास नाहीच
*  रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळताच धावण्यास सुरुवात

एप्रिल महिन्यापासून चाचण्यांच्याच कचाटय़ात अडकलेली वातानुकूलित लोकल मध्य रेल्वेलाच नकोशी झाली आहे. त्यामुळे ही नवी कोरी गारेगार प्रवासाचा आनंद देणारी वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवासीयांच्याच नशिबात असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार उपनगरीय रेल्वेमार्गावर महत्त्वाचे बदल करून ही गाडी चर्चगेटपर्यंत चालवणे शक्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेला ही गाडी घेण्याबाबतचे विनंतिपत्र पाठवले होते. पश्चिम रेल्वेने आपल्या मुंबई विभागाकडून ही गाडी उपनगरीय क्षेत्रात चालवण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार उपनगरीय रेल्वेमार्गावर काही महत्त्वाचे बदल करून ही गाडी थेट चर्चगेटपर्यंत चालवणे शक्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. आता पश्चिम रेल्वे मुख्यालयाने याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाला कळवायचा आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही गाडी पश्चिम रेल्वेवर धावू शकेल.

मुंबईकरांना गारेगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी शहरात येणारी वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्याची मूळ योजना होती. मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त भार सांभाळत असताना त्यांनी ही गाडी मध्य रेल्वेवर चालवण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानंतर ही गाडी गेल्या वर्षी ५ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे जवळपास सहा महिने ही गाडी कारशेडमध्ये तशीच उभी होती.

या गाडीच्या कारशेडमधील चाचण्या मध्य रेल्वेवर पार पडल्यानंतर गाडीची उंची आणि मध्य रेल्वेवरील अनेक ठिकाणी असलेल्या जुन्या पुलांची उंची यांमुळे ही गाडी चालवण्यास अडचण असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मध्य रेल्वेतर्फे पश्चिम रेल्वेला ही गाडी त्यांनी चालवण्यासाठी घ्यावी, असे पत्र पाठवण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाला याबाबतचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते.

या सर्वेक्षणानुसार माहीम, माटुंगा आणि महालक्ष्मी येथे या गाडीच्या उंचीची समस्या होती. माहीम आणि माटुंगा येथे असलेल्या दोन जुन्या पुलांखाली गाडीची उंची अडत होती; पण हे दोन्ही पूल तुटून नव्याने बांधण्यात येणार असल्याने ही समस्या दूर होणार आहे. तसेच महालक्ष्मी येथे रेल्वेरूळ खाली करून किंवा ओव्हरहेड वायर वर करून अथवा शक्य झाल्यास दोन्ही गोष्टी करून या गाडीसाठी मार्ग मोकळा केला जाऊ शकतो, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी स्पष्ट केले.

हा सर्वेक्षण अहवाल दीड महिन्यापूर्वी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. महालक्ष्मी येथे कोणता विभाग काय काम करेल, याची चाचपणी सुरू आहे. त्यावर दोन आठवडय़ांमध्ये निर्णय झाल्यावर नंतरच या गाडीबाबतचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून रेल्वे बोर्डाला कळवला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. ही कामे झाल्यानंतर ही गाडी चर्चगेट ते डहाणू यादरम्यान जलद मार्गावर कुठेही धावू शकेल.