स्वयंचलित दरवाज्यांच्या गाडीबाबत मध्य रेल्वेने आग्रही भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्ष ही गाडी लवकरात लवकर रुळांवर यावी, यासाठी पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे.
असा स्वयंचलित दरवाज्यांचा एक डबा पश्चिम रेल्वेने प्रत्यक्षात आणला असून पुढील दोन महिन्यांतच पश्चिम रेल्वेमार्गावरील एका गाडीच्या महिला डब्याचे दोन दरवाजे स्वयंचलित प्रणालीवर उघडबंद होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी येथील कारशेडमध्ये मंगळवारी स्वयंचलित दरवाज्यांच्या एका डब्याचे परीक्षण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंतकुमार यांनी केले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. धावत्या लोकलच्या दरवाज्यातून पडून होणाऱ्या अपघातांत दरवर्षी दीड ते दोन हजार प्रवासी मृत्युमुखी पडतात आणि एवढेच प्रवासी जखमी होतात. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी स्वयंचलित दरवाज्यांचा पर्याय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी माडला होता. पश्चिम रेल्वेने याबाबत पुढाकार घेत एका जून्या गाडीच्या दरवाज्यावर ही स्वयंचलित प्रणाली बसवली आहे. या प्रणालीची पाहणी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंतकुमार यांनी केली. १२ डब्यांच्या एका गाडीला असलेल्या सर्वच्या सर्व दारांना ही स्वयंचलित दरवाज्यांची प्रणाली बसवण्यासाठी ४.५ ते पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हे दरवाजे उघडण्यासाठी अडीच आणि बंद होण्यासाठी अडीच सेकंद असा पाच सेकंदांचा कालावधी लागतो. त्यामुळे गाडीच्या ३० सेकंदांच्या थांब्यातील ही पाच सेकंद कमी होणार आहेत.
* इतर गाडय़ांमध्येही अशा प्रकारे स्वयंचलित दरवाजे बसवणे शक्य.
* दरवाजे बसवण्यात काही अडचणी.
* त्यापैकी मुख्य अडचण वायुविजनाची.
* त्यासाठी सध्या असलेल्या खिडक्या मोठय़ा करता येतील का, उघडबंद होणाऱ्या खिडक्या बसवता येतील का, तसेच वायुविजनासाठी असलेल्या झडपा मोठय़ा करता येतील का, याचा विचारविनिमय.
* प्रणाली बसवल्यानंतर सामान ठेवण्याचा रॅक काढावा लागेल. त्याची काय सोय होऊ शकेल, याबाबतही चाचपणी.
* गार्ड आणि मोटरमन यांच्या केबिनशी या प्रणालीचे एकात्मीकरण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न.
* सध्याच्या डब्यांमध्ये हे बदल करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी.