सुरक्षा तपासणी अहवालानंतर निर्णय

मुंबई : ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले चर्चगेट स्थानकाबाहेरील महात्मा गांधीजींचे भित्तिचित्र काढण्यात आले असून, चर्चगेट स्थानक तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा सुरक्षा अहवाल आल्यानंतरच हे भित्तिचित्र लावायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या या भित्तिचित्राचा भाग पडून एका ज्येष्ठाचा त्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे हे भित्तिचित्र वादात सापडले होते. सुशोभीकरणाच्या कामाची तपासणी पश्चिम रेल्वेच्या पावसाळापूर्व पाहणीत करण्यात आली होती. त्यानंतरही हा अपघात घडल्याने रेल्वे प्रशासनाने त्रयस्थ खासगी संस्थेकडून संपूर्ण चर्चगेट स्थानकाची सुरक्षाविषयक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या घटनेच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समितीदेखील नेमण्यात आली आहे.

मंगळवारी हे भित्तिचित्र काढण्यात आले. त्यावर पावसाळ्यानिमित्त हे भित्तिचित्र काढण्यात आले असून चर्चगेट स्थानकाच्या सुरक्षा तपासणीचा अहवाल आल्यानंतरच ते लावायचे की नाही त्याबाबत निर्णय घेऊ , अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.