थांब्यासाठी सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव

लोकल गाडय़ांना होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून कल्याणपर्यंत असणारी जलद १५ डबा लोकल कल्याणनंतर कर्जत, कसारापर्यंत धीम्या मार्गावर चालवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. असे असतानाच अंधेरी ते विरापर्यंत होणाऱ्या गर्दीमुळे लोकलवर पडणारा ताण पाहता पश्चिम रेल्वेने या दरम्यान धीम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळताच या लोकल चालवण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकल चालवण्यात येत असतानाच प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे बारा डबा लोकल गाडय़ांनाही होणारी गर्दी पाहता या दोन्ही मार्गावर १५ डबा जलद लोकल चालवण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एक १५ डबा जलद लोकल धावत असून तिच्या १६ फेऱ्या होत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणूपर्यंत दोन १५ डबा जलद लोकलच्या ४२ फेऱ्या होतात. मध्य रेल्वेने कल्याणपासून पुढे कर्जत, कसारापर्यंत १५ डबा लोकलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. याचबरोबर आता पश्चिम रेल्वेनेही अंधेरी ते विरापर्यंत लोकल गाडय़ांना होणारी गर्दी पाहता या पट्टय़ात धिम्या मार्गावर लोकल चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

‘अंधेरी ते विरापर्यंत धीम्या मार्गावर बारा डबा लोकल चालवल्या जातात. आता अंधेरी ते विरार दरम्यान धीम्या मार्गावरच १५ डबा लोकल चालवण्याचे निजोजन केले आहे. तसा प्रस्ताव असून रेल्वे बोर्डाकडून मंजुरी घेण्यात येईल. यासाठी अंधेरीपासून १४ स्थानकांतील ३१ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल. त्यासाठी ५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रस्ताव मंजूर होताच साधारण याचे काम त्वरित सुरू केले जाईल,’ असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.

१५ डब्यांच्या ५४ फेऱ्या

सध्या पश्चिम रेल्वेकडून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले असून १२ डब्यांची एक लोकल आता १५ डब्यांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ डब्यांच्या ४२ फेऱ्यांची संख्या ५४ पर्यंत पोहोचली. नवीन १५ डबा लोकलच्या फेऱ्या चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते बोरिवली, दादर ते विरार यादरम्यानसाठी आहेत.