तांत्रिक माहिती जमा करण्याची प्रक्रिया; मंजुरी मिळेपर्यंत वर्षअखेर उजाडणार

एक वर्ष उलटून गेल्यांनतरही अद्याप मुंबईकरांच्या सेवेत दाखल न झालेली वातानुकूलित लोकल आता या वर्षांच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. सध्या या लोकलच्या काही चाचण्या बाकी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेच्या आरडीएसओने (रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन) तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून त्याची माहिती जमा करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

५४ कोटी रुपये किमतीची आणि बारा डब्यांची असलेली वातानुकूलित लोकल एक वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. या लोकलच्या कारशेडमध्ये आणि कारशेडबाहेर कर्जत दरम्यान यशस्वीरीत्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र वातानुकूलित लोकलची जादा असलेली उंची आणि सीएसटी ते कुर्ला दरम्यान कमी उंचींचे पूल पाहता मध्य रेल्वेने ही लोकल चालवण्यास नकार दिला. तर पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल चालवण्याची उत्सुकता दाखवली. तीन ते चार महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल झालेल्या या लोकलच्या चाचण्या घेण्यात येत आहे. वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर कोणत्या स्थानकांदरम्यान चालवायची यावरही विचारविनिमय सुरू आहे. सध्या वांद्रे, दादरपासून विरापर्यंत प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.

या दरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी अधिक असल्याने एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे ही लोकल चर्चगेटऐवजी दादरपासून किंवा वांद्रे स्थानकापासून डाऊन दिशेला चालवता येऊ शकते का, यावर पश्चिम रेल्वे विचार करत आहे. या लोकलच्या सकाळी आणि संध्याकाळी असे गर्दीच्या वेळी १२ फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की, आरडीएसओने उपस्थित केलेल्या इलेक्ट्रिकल, ब्रेकिंग यासह काही तांत्रिक मुद्दय़ांची माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेऊन ही लोकल डिसेंबपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल, असे त्यांनी सांगितले.

* नवीन वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांचा ऑक्टोबरच्या नवीन लोकल वेळापत्रकात समावेश करून ती चालवण्याचे नियोजन होते. परंतु आता या लोकलसाठी  नवीन मुहूर्त देण्यात आला आहे.

* चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) बनलेल्या या लोकलची प्रवासी क्षमता ही ५ हजार ९६४ एवढी आहे.