रेल्वेशी संबंधित सर्व सोयी-सुविधांची माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळावी यासाठी ‘दिशा’ अ‍ॅप काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. आता या अ‍ॅपमार्फत प्रवाशांना रेल्वेची थेट (लाइव्ह) माहिती मिळणार आहे. यात मेगाब्लॉकबरोबरच रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाडय़ा, विशेष गाडय़ा इत्यादी माहिती उपलब्ध होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘दिशा’ अ‍ॅप सुरू केले. हे अ‍ॅप सुरू होताच ते प्रवाशांच्या पसंतीस उतरले. यावर स्थानकात उपलब्ध केले जाणारे वायफाय, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, खाद्यपदार्थ सुविधा, रेल्वे पोलिसांसह अन्य माहिती मिळते. अ‍ॅपमधून आणखी कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे याबाबत प्रवाशांचे मत विचारात घेण्यात आले आणि त्यानुसार बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने रेल्वेशी संबंधित कामांची थेट माहिती मिळावी, असे मत प्रवाशांनी मांडले. त्यानुसार ‘दिशा’ अ‍ॅपमध्ये काही बदल करण्यात आले.

प्रवासी ४५ मिनिटे किंवा एक तास आधीदेखील प्रवास करण्यास सुरुवात करेल, त्यावेळीही गाडीच्या आगमन किंवा विलंबाची वेळ या अ‍ॅपवर दाखवू शकतो.

त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉलवरील खाद्यपदार्थाच्या किमतीही अ‍ॅपमध्ये नमूद केल्या जातील. सुरू असलेले मेगा किंवा जम्बो ब्लॉक, विशेष गाडय़ा, रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा यांचीही माहिती अ‍ॅपवर मिळणार आहे.

‘अ‍ॅप’वरुन काय कळणार?

रेल्वे स्थानकात एखाद्या फलाटात येणारी गाडी किती वेळात येईल याची माहिती इंडिकेटरवर उपलब्ध होते. ही माहिती या मोबाइल अ‍ॅपवरही देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जर प्रवासी ३० मिनिटे आधी प्रवासाला सुरुवात करत असेल तर या अ‍ॅपवर ती गाडी उशिरा आहे की वेळेत याची माहिती देईल.