१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘जेईई’च्या, तर १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने सोमवारी रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेनंही जेईईच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

“जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ४६ अतिरिक्त रेल्वे गाड्या सो़डण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या सोडण्यात येतील. तसंच यापूर्वी चालवण्यात येणाऱ्या ३५० ट्रेन व्यतिरिक्त या ट्रेन धावतील,” अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुंबई महानगरात ‘जेईई’ची परीक्षा देणारे सुमारे २७ हजार विद्यार्थी असून, ‘नीट’ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच (हॉल तिकीट) रेल्वेप्रवासाची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असेही रेल्वे प्रशासनानं यापूर्वी स्पष्ट केलं होतं.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरुन सध्या साडेतीन लाखांहून अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रत्येकी ३५० रेल्वे फेऱ्या चालवते. अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्याने कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, विरार येथून मुंबई शहराच्या दिशेने किंवा शहरातून उपनगराकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप होतो. बेस्ट, एसटी, खासगी वाहनाने प्रवास वेळखाऊ आहे. १ ते ६ सप्टेंबपर्यंत ‘जेईई’ची परीक्षा देणाऱ्या व १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचीच चिंता होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून रेल्वेप्रवासाच्या परवानगीची मागणी होत होती. यासाठी विद्यार्थी, प्रवासी संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनीही मागणी केली. मात्र, प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारचा असल्याचं मध्य व पश्चिम रेल्वेने स्पष्ट केल्यानंतर सोमवारी परवानगी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

‘बेस्ट’चीही सुविधा

जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना बेस्टमधूनही प्रवास करण्याची मुभा असेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी प्रवेशपत्र बाळगावं, असंही बेस्टनं स्पष्ट केलं आहे.

हजारो विद्यार्थ्यांना लाभ..

राज्यात ‘जेईई’साठी १ लाख १० हजार ३०० विद्यार्थी बसणार असून, मुंबई व नवी मुंबईत २० हजार २५६ आणि ठाण्यात ७ हजार १९१ विद्यार्थी आहेत. १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’च्या परीक्षेसाठी मुंबईतून २१ हजार ३९६, ठाण्यातून १० हजार ४२० आणि नवी मुंबईतून ८ हजार २७९ विद्यार्थी आहेत.