महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे पोलिसांकडून विविध सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या जात असतानाच पश्चिम रेल्वेने ‘आयवॉच रेल्वेज’ मोबाईल अ‍ॅप महिलांसाठी विकसित केले आहे. रेल्वे प्रवासात आपत्कालीन परिस्थितीत महिलांना या अ‍ॅपद्वारे रेल्वे सुरक्षा दलाकडून तात्काळ मदत मिळवता येईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. स्मार्ट फोनवर हे अ‍ॅप महिला प्रवाशांना उपलब्ध होईल.

रेल्वे प्रवासात महिलांना विनयभंग, छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेकडून लोकलच्या महिला डब्यात सीसीटिव्ही देखील बसवण्यात आले. आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्वच डब्यात सीसीटिव्ही बसवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांसाठी ‘आयवॉच रेल्वेज’ ह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. आपातकालिन परिस्थितीत या अ‍ॅपद्वारे महिला प्रवासी ठिकाण, घटनेचा व्हिडीओ तसेच एखादा ऑडिओ पाठवू शकतील. मुंबई सेन्ट्रल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात या अ‍ॅपचे नियंत्रण कक्ष असून या कक्षातून तात्काळ संबधित रेल्वे स्थानकाशी संपर्क साधून महिला प्रवाशांना मदत पोहोचवू शकता येते. महिला प्रवाशांना या अ‍ॅपद्वारे एकाचवेळी आठ जणांनाही संदेश पाठवता येईल, अशी सुविधाही आहे. अ‍ॅपसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅप कसे हाताळाल?

* अ‍ॅलर्ट बटन- अ‍ॅलर्ट बटन दाबताच किंवा त्यावर असणारे पॉवर बटन चार वेळा दाबताच रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षालामाहीती मिळेल. तसेच  प्रवाशाच्या माहितीतील आठ जणांनाही संदेश प्राप्त होईल.

* ठिकाण- नियंत्रण कक्षातील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान महिला प्रवासी सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत तिचा माग घेऊ शकतील.

* व्हिडीओ- अ‍ॅपवर ६० सेकंदाचा अ‍ॅलर्ट व्हिडीओही डाऊनलोड करता येते.

* सुरक्षा- त्यांनतर रेल्वे सुरक्षा दलाकडून तात्काळ मदतही पोहोचवता येवू शकते.