खिळखिळीत झालेली सार्वजनिक वाहतूक आणि सुलभ हप्त्यावर उपलब्ध होणारे वाहन यांमुळे पश्चिम उपनगरात सर्वाधिक दुचाकीची खरेदी होत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी हाच आकडा तब्बल ४० टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतुकीच्या समस्या झपाटय़ाने वाढणार असल्याची खंत वाहतूक अभ्यासक नोंदवत आहे.
उपनगरातील दुचाकी खरेदीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या चार वर्षांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक दुचाकींची विक्री झाली आहे. शहरात प्रत्येक वर्षी वाढणाऱ्या सुमारे एक लाख दुचाकींतील ४५ ते ५० टक्के खरेदी ही पश्चिम उपनगरातून होत आहे. सध्या शहरात १५ लाख ९६ हजार दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. यातील सात लाख २८ हजार दुचाकींची नोंदणी एकटय़ा पश्चिम उपनगरातून करण्यात आली आहे. शहराच्या एकूण लांबीचा विचार केल्यास दोन हजार किलो मीटरच्या रस्त्यावर सध्या प्रत्येक किलोमीटरला ७९८ दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. चार वर्षांपूर्वी हाच आकडे ५२२ वर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या दुचाकीचे प्रमाण घातक असल्याची टीकाही केली जात आहे.
शहराची भौगोलिक रचना पाहता पश्चिम उपनगराचा सातत्याने विस्तार होत असल्याने लोकवस्ती झपाटय़ाने वाढत आहे. यातील बहुसंख्य लोक दक्षिण मुंबईत नोकरी किंवा व्यवसायासाठी येत आहेत. त्यात सार्वजनिक वाहतूक अपुरी पडत असल्याने उपनगरात राहणारे लोक कमी किमतीत उपलब्ध होणारी दुचाकीची खरेदी करत आहेत. त्यामुळे दुचाकी खरेदीचा आलेख दरवर्षी वाढता आहे. ही बाब गंभीर असून सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नाकडे वेळेत लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात शहरात मोठय़ा समस्या उद्भवू शकतील, असे वाहतूकतज्ज्ञ विवेक प यांनी सांगितले.

क्षेत्र                                 २०१५-१६             २०१४-१५                      २०१३-१४
पश्चिम उपनगर                ७.२८ लाख           ६.८२ लाख                   ६.६३ लाख
पूर्व उपनगर                      ३.८० लाख            ३.४९ लाख                   ३.१७ लाख
दक्षिण                               ४.८८ लाख            ४.३८ लाख               ३.६९ लाख