ऊर्जा अक्षय्यतेचा नियम कचऱ्यालाही लागू होतो. म्हणजे कचरा निर्माण करता येत नाही किंवा तो नष्टही करता येत नाही. त्याचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होते. कचरा निर्माण करता येत नाही, हे पटले नसेलच.. कारण मग रोज घरातून सकाळी सकाळी बाहेर ठेवतो तो कचरा तर घरातच तयार होतो. पण तसे नाही. टाकलेल्या वस्तूला कचरा म्हणत असलो तरी प्रत्येक टाकाऊ वस्तूचा काही ना काही उपयोग होतो. म्हणजेच एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याला जी वस्तू टाकाऊ वाटेल ती दुसऱ्याला वाटेलच असे नाही आणि त्यामुळेच दोन घरात माणसांची संख्या सारखी असली तरी कचऱ्याचे प्रमाण सारखे असेलच असे नाही. किंबहुना ते नसतेच. जे पिंडी ते ब्रह्मांडी. कचऱ्याचे हे सूत्र सर्व जगाला लागू पडते आणि त्यामुळेच कचरा कशाला म्हणावे याच्या प्रत्येकाच्या कल्पनाच भिन्न असल्याचे स्पष्ट होते.

अगदी जागतिक बँकेने जगातील घनकचऱ्यासंबंधी केलेल्या अहवालातही हेच दिसून आले. गेल्या वर्षी, २०१५ मध्ये जागतिक बँकेने घनकचऱ्यासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला. ‘व्हॉट अ वेस्ट : अ ग्लोबल रिव्ह्य़ू ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट’ हे त्या अहवालाचे नाव. घर, शेती, व्यवसाय, व्यापार, कार्यालये तसेच हानीकारक नसलेला औद्योगिक कचरा यांचा घनकचऱ्यात विचार केला आहे. या अहवालानुसार दहा वर्षांनंतर म्हणजे २०२५ मध्ये प्रति माणशी कचऱ्याचे प्रमाण दुपटीहून अधिक होईल, असे दाखवण्यात आले. सध्या दरदिवशी प्रति माणशी ६४० ग्रॅम कचरा तयार होतो. दहा वर्षांनी कचऱ्याचे हे प्रमाण १ किलो ४२० ग्रॅम होईल. याचा सोपा अर्थ असा की चार जणांच्या कुटुंबातून दरदिवशी साडेपाच किलो कचरा तयार होईल. यामुळे जगातील कचऱ्याचे प्रमाण तिपटीने वाढेल. आता जगभरात दरवर्षी तब्बल ६८ कोटी टन कचरा (मुंबईचे प्रमाण ३७०० टन) तयार होतो तो दहा वर्षांनी २२० कोटी टनांवर पोहोचेल. खरी मेख पुढे आहे. ती म्हणजे, कचरा तयार होण्याचे प्रमाण जगभरात सारखे नाही. श्रीमंतांकडून अधिक प्रमाणावर तर गरिबांकडून कमी प्रमाणात कचरा तयार होतो, हे वैश्विक सत्य आहे. त्यातही प्रत्येक देशानुसार, शहरानुसार एवढेच नव्हे तर शहरातील वस्तीनुसार कचऱ्याचे प्रमाण बदलते. जगभरातील गरिबांकडून सरासरी ६०० ग्रॅम तर श्रीमंतांकडून २ किलो १३० ग्रॅम कचरा प्रति माणशी प्रति दिवशी केला जातो. त्यातही जगातील कचरा ‘निर्मिती’त गरिबांचा वाटा अवघा ६ टक्के तर श्रीमंतांचा वाटा ४६ टक्के आहे.

चार वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार लहान बेट असलेल्या देशांमध्ये कचरानिर्मितीचे प्रमाण अधिक असल्याचे हा अहवाल सांगतो. त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो (१४.४० किलो प्रति माणशी प्रति दिनी), अ‍ॅण्टिगा अ‍ॅण्ड बार्बुडा (साडेपाच किलो) व सेंट किट्स अ‍ॅण्ड नेव्हिस (५.४५ किलो) हे चिमुकले देश कचरानिर्मितीत आघाडीवर आहेत. आपल्या शेजारच्या श्रीलंकेचा चौथा क्रमांक लागतो. या देशात दरदिवशी प्रति माणशी साधारण ५ किलो कचरा तयार होतो. अर्थात या बेटांची लोकसंख्या कमी असल्याने एकूण जगाच्या कचऱ्यात त्यांचा वाटा नगण्य आहे. विकसित देशांमध्ये न्यूझीलंड (३.६८ किलो), आर्यलड (३.५८ किलो), नॉर्वे (२.८० किलो), स्वित्र्झलड (२.६१ किलो) आणि अमेरिका (२.५८ किलो) या देशांचा कचरा निर्मितीत पहिल्या पाचात समावेश आहे. घाणा (९० ग्रॅम) आणि उरुग्वे (११० ग्रॅम) या राष्ट्रांमध्ये प्रति माणशी सर्वात कमी कचरा टाकला जातो.

भारताचा विकसित देशांच्या यादीत वरचा क्रमांक नसल्याने देशात कचऱ्याचे प्रमाण प्रति माणशी कमी असणार हे नक्की. त्यातही इतर देशांप्रमाणेच भारतातील ७० टक्के कचरा हा शहरांमधून तयार होतो. चेन्नईचा त्यात वरचा क्रमांक लागतो. या शहरात प्रत्येक माणूस दिवसाला ७०० ग्रॅम कचऱ्याची निर्मिती करतो. कोलकातामध्ये ६५० ग्रॅम तर दिल्ली, हैदराबादमध्ये ५०० ग्रॅम कचरा तयार होतो. मुंबईही त्याच्या खालोखाल आहे. मात्र मुंबईतील कचऱ्याचे प्रमाणही वस्तीनुसार बदलते. गरिबांचा कचरा रस्त्यावर, नाल्यात ‘दिसत’ असला तरी त्याच्या तुलनेत श्रीमंतांकडून होत असलेला कचरा नेहमीच जास्त असतो. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. मात्र आपली त्यांच्याशी या बाबत स्पर्धा नाहीये. असूही नये.

त्यापेक्षा जगातील राष्ट्रांना अर्थपुरवठा करणाऱ्या जागतिक बँकेला हे कचऱ्याचे अप्रूप का वाटले याचा विचार करूया. टाकून दिलेल्या वस्तूंना एवढे महत्त्व का? ऊर्जा अक्षय्यतेचा कचऱ्याला लागू पडणारा नियम हे त्याचे कारण. कचरा नष्ट करता येत नाही. आणि त्याचा सजीव प्राण्यांना त्रास होऊ नये या प्रकारात रूपांतर करण्यासाठी येणारा खर्च प्रचंड आहे. त्यातून होणारे प्रदूषण व आजार हे आणखी साइड इफेक्ट्स.

मुंबईतील पूर्ण भरलेल्या कचराभूमी, आग लागून होणारे प्रदूषण, नवीन जागा उपलब्ध न होणे, कचरा गोळा करण्यासाठी- टाकण्यासाठी – कचराभूमी शास्त्रीय पद्धतीने बंद करण्यासाठी केला जाणारा हजारो कोटींचा खर्च.. या सगळ्यापेक्षा कचऱ्याचे प्रमाण कमी करणे म्हणजेच टाकत असलेल्या गोष्टीकडे डोळे व मेंदू उघडे ठेवून पाहणे हा सर्वात सोपा उपाय.