* नाटय़निर्माता संघाचा सवाल
* एकसदस्यीय अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी
नाटय़परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांना ज्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले, त्या चांदवड प्रकरणाच्या अहवालाचे पुढे काय झाले? हा अहवाल लोकांपर्यंत का पोहोचला नाही, असे अनेक जळजळीत प्रश्न नाटय़निर्माता संघाने उचलले आहेत. नाटय़निर्माता संघाची एकंदरीत भूमिका पाहता नाटय़परिषदेच्या येत्या निवडणुकीत मोहन जोशी यांच्या उमेदवारीला नाटय़निर्माता संघाचा विरोध असल्याचे चिन्ह आहे. मात्र, चांदवड प्रकरणाचा अहवाल ही नाटय़परिषदेची अंतर्गत बाब असल्याने तो प्रकाशात आणण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मावळते अध्यक्ष हेमंत टकले यांनी मांडली आहे.
मोहन जोशी यांनी चांदवड येथे २०११च्या सुमारास केलेल्या गैरप्रकारानंतर नाटय़सृष्टीत नाराजीची प्रतिक्रिया होती. त्यानंतर मोहन जोशी यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली आणि त्यानुसार झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला. मात्र नाटय़परिषदेच्या नियामक मंडळाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हेमंत टकले यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली होती.
या समितीच्या अहवालात काय निष्पन्न झाले, नेमका ठपका कोणावर ठेवला गेला, दोषींवर नाटय़परिषद काय कारवाई करणार, याबाबत नाटय़परिषदेने अद्याप काहीच जाहीर केलेले नाही. आगामी निवडणुकांचा विचार करता नाटय़परिषदेने हा अहवाल लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यामुळे नेमके कोणाला मत द्यावे, कोण काम करेल, कोणी आतापर्यंत काय केले आहे वगैरे सगळेच तपशील मतदारांपर्यंत पोहोचतील, असे नाटय़निर्माता संघातील काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, हा अहवाल म्हणजे नाटय़परिषदेचा अंतर्गत मामला आहे, अशी भूमिका टकले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. या समितीचा अहवाल आपण नियामक मंडळासमोर ठेवला आहे. मोहन जोशी यांनी त्याच वेळी झाल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी त्वरीत राजीनामाही दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर अन्य कारवाई करण्याचा प्रश्नच येत नव्हता, असे ते म्हणाले.
हा अहवाल जाहीर होवो किंवा न होवो, येत्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नाटय़निर्माता संघ अधिकाधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाटय़वर्तुळातून व्यक्त होत आहे.