मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या ‘नटराज’ आणि ‘उत्स्फूर्त’ या पॅनल्सनी आपला जाहीरनामा जाहीर केला असून त्यात ‘बाल रंगभूमी व प्रायोगिक रंगभूमीसाठी ठोस योजना राबवू,’ असे अभिवचन दिले आहे.
या दोन्ही पॅनलमधील उमेदवारांनी गेल्या १० वर्षांत नाटय़ परिषदेचा कारभार सांभाळताना प्रायोगिक किंवा बाल रंगभूमीचा विचारच केलेला नाही. त्यामुळे आता दिलेली आश्वासने म्हणजे ‘बोलाची कढी..’ आहेत का, असा प्रश्न प्रायोगिक व बाल रंगभूमीवरील रंगकर्मीना पडला आहे.
प्रायोगिक रंगकर्मीनी दामू केंकरे यांच्या नेतृत्वाखाली १४ जून २००७ रोजी मोर्चा काढल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही जागा म्हणजे यशवंत नाटय़ मंदिरावरील छोटीशी तालमीची खोली असेल, असे आम्हाला वाटले नव्हते. प्रायोगिक रंगभूमी म्हटल्यावर केवळ जागेभोवतीच सर्व प्रश्न फिरतात, असे प्रायोगिक रंगकर्मी अरुण काकडे यांनी सांगितले.
नाटय़ परिषदेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, ती बाल रंगभूमीसाठी देण्यात आली होती. मात्र सुधा करमरकर यांनी ती नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्याकडे सुपूर्द केली. बाल रंगभूमीसाठी तेथे काहीतरी तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नाटय़ परिषदेने भाडय़ात सवलत देण्याखेरीच काहीच केले नाही, असे नरेंद्र आंगणे यांनी सांगितले.
दोन्ही पॅनल्सनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर पूर्ण होतील का, अशी शंका रंगकर्मी व्यक्त करीत आहेत.
ज्यां रंगभूमीकडे उद्याचे कलाकार म्हणून आशेने पहायचे त्या बाल रंगभूमीकडेही असे दुर्लक्ष सातत्याने केले जात असेल तर भविष्याबद्दल न बोललेलेच बरे, अशी भावना सुद्धा अनेक रंगकर्मीनी व्यक्त केली.