News Flash

शिक्षण मंडळे करतात काय ?

अभ्यासक्रम आराखडा हा महत्त्वाचा मार्गदर्शक दस्तावेज आहे. तो विद्यार्थीकेंद्रित आहे. नव्या आराखडय़ामध्ये मांडण्यात आलेल्या रचनावादी शिक्षणाचा उद्देश साध्य होण्यासाठी शाळांनी, पालकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज

| August 6, 2013 04:19 am

अभ्यासक्रम आराखडा हा महत्त्वाचा मार्गदर्शक दस्तावेज आहे. तो विद्यार्थीकेंद्रित आहे. नव्या आराखडय़ामध्ये मांडण्यात आलेल्या रचनावादी शिक्षणाचा उद्देश साध्य होण्यासाठी शाळांनी, पालकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असा विचार ‘लोकसत्ता’ आणि सारस्वत बँकेने आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या नव्या उपक्रमामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षण मंडळाच्या भूमिकेबाबत बोलताना तज्ज्ञांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आणि सारस्वत बँकेतर्फे एकत्रितपणे सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५ आणि त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने पेलण्यास राज्य शिक्षण मंडळे आणि शाळा कितपत तयार आहेत यावर दुसऱ्या सत्रात चर्चा झाली.  या परिसंवादामध्ये ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’चे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान, आर. एल. पोद्दार शाळेच्या मुख्याध्यापिका अवनिता बीर, ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ शाळेचे सचिव मिलिंद चिंदरकर आणि ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा मंडळा’च्या सदस्या रेखा पळशीकर सहभागी झाले होते. लोकसत्ताच्या प्रतिनिधी रेश्मा शिवडेकर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
सुरुवातीला ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’चे संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ा’ची (एनसीएफ) उद्दिष्टय़े स्पष्ट करताना तो पारंपरिक शैक्षणिक विचारांना कसा छेद देणारा आहे, हे सांगितले. ज्ञान रचले जावे, फक्त दिले किंवा घेतले जाऊ नये, असा ज्ञानरचनावाद या आराखडय़ातून अपेक्षित आहे. आपला हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले ‘‘प्रत्येक विषयाला एक संस्कृती आहे. ती संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम शिक्षकांचे आहे. फक्त शिकण्याची संधी उपलब्ध करून देणेच नव्हे तर ही संस्कृती रुजविणे आणि त्यासाठी मंच तयार करणे हेदेखील शिक्षकांचे काम आहे. पण इथे काही गोष्टी गरपद्धतीने वापरल्या जातात. त्यामुळेच प्रकल्पांची दुकाने झाली आहेत, या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अवनिता बीर म्हणाल्या, ‘‘एनसीएफ आल्यामुळे शिक्षणाच्या भूमिकेला ऐतिहासिक दृष्टिकोन आला आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करणे आणि शिक्षणाचा संबंध त्यांच्या आयुष्याशी जोडणे ही याची मूलभूत उद्दिष्टय़े आहेत. म्हणूनच वर्षांच्या शेवटी एकच मोठी परीक्षा घेऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन या नव्या पद्धतीत अपेक्षित नाही. त्याऐवजी सातत्यपूर्ण आणि सर्वागीण मूल्यमापन करण्यास सांगितले आहे.’’  सीबीएससी बोर्डाचे यासाठीचे प्रयत्न विषद करताना त्या म्हणाल्या की, शिक्षकांचे वर्षांला किमान सहा दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हे प्रभावीपणे अंमलात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रयोगशील शिक्षण राबवताना आलेले अनुभव सांगतानाच नव्या अभ्यासक्रम आराखडय़ाच्या अंमलबजावणीमध्ये शाळांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मिलिंद चिंदरकर यांनी स्पष्ट केले.  विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे अनुभव देताना त्यामध्ये काही धोके आहेतही, पण ते पत्करले पहिजेत. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण मिळणे आणि शिक्षकांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, ही प्रशिक्षणे १ ते १५ जून या कालावधीतच व्हावीत, जेणेकरून प्रत्यक्ष शिकवणे सुरू झाले की त्यामध्ये प्रशिक्षणे येऊ नयेत,’’ अशी सूचना त्यांनी केली.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ावर आधारित तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाचे वैशिष्टय़ आणि अभ्यासक्रम आराखडा निर्मिती मंडळाची भूमिका रेखा पळशीकर यांनी स्पष्ट केली. पळशीकर म्हणाल्या, ‘‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, राज्य अभ्यास मंडळ आणि पाठय़पुस्तक निर्मिती मंडळ या तीनही स्वायत्त संस्थांनी प्रथमच एकत्र येऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा (एससीएफ) तयार केला.
स्थानिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, त्यात एनसीएफच्या मूळ उद्देशाला धक्का लावलेला नाही.’’ हा आराखडा ग्रामीण भागापर्यंत पोचला, पण प्रत्येकापर्यंत तो पाझरला नाही. याचा दोष नक्की कुणाचा?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चर्चासत्रातील मुख्य मुद्दे 4
* राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे काय?
* ज्ञानरचनावाद कसा आणावा?
* राज्य आराखडय़ाचा दृष्टीकोन
* अनुभवाधारीत शिक्षण

पावसावरचा निबंध वर्गात बसून शिकण्यापेक्षा पहिल्या पावसात भिजण्याची मजा देऊन त्यानंतर विद्यार्थ्यांनी निबंध लिहिणे यामध्ये नक्कीच फरक आहे. फक्त वर्गातले शिक्षण कुचकामी आहे. पण हे अनुभवाधारित शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग करायला शिकवते. यातूनच कोणत्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वातील शक्तीस्थाने आहेत, याची ओळख होते. उत्तम शिक्षणासाठी शिक्षकांनी कल्पकतेने उपक्रम राबवणे आणि त्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे आहे.
– मिलिंद चिंदरकर

ज्ञान देणे यापेक्षाही ज्ञान रचणे अपेक्षित  – हेमचंद्र प्रधान  
जागतिक शिक्षण पद्धतीत वेगवेगळे प्रवाह एकत्र येताहेत त्यांना भारतातही आणायचा प्रयत्न या दस्तावेजातून झाला आहे. मूल जन्मल्यापासून विचार करतं आणि त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं या महत्त्वाच्या गृहितकांवर हा आराखडा बेतलेला आहे. यात ज्ञान रचले जाणे अपेक्षित आहे.

अनिवार्यतेशिवाय  काहीच होत नाही – अवनिता बीर
एनसीएफची प्रत संकेतस्थळावर उपलब्ध असूनही शिक्षकांनी ती पाहिलीदेखील नव्हती. शेवटी सीबीएससीने ती शाळेत ठेवणे बंधनकारक केले तेव्हा त्याचा परिणाम जाणवला. कुठलीही गोष्ट बंधनकारक केल्याशिवाय आपल्याकडे ती होत नाही. मुलांना ‘अ‍ॅडाप्टिव्ह स्किल’ देणे हे शेवटी शाळेचे काम आहे.

सामाजिक जाणीवा जागृत होणे गरजेचे – मिलिंद चिंदरकर
विद्यार्थ्यांना वर्गात बसून संज्ञा शिकवण्यापेक्षा ती संज्ञा का तयार झाली, हे कळणे म्हणजे शिक्षण. पुस्तका-पलिकडच्या अनुभवातून मिळणाऱ्या शिक्षणातून मुलांच्या सामाजिक जाणीवा जागृत होतील आणि तेव्हाच ज्ञान रचनावादाचा उद्देश साध्य होईल.

अभ्यास मंडळांची बरखास्ती हा पर्याय नाही – रेखा पळशीकर
पुस्तकांमध्ये चुका होतात, त्यावर चर्चा होते. मात्र, पुस्तक निर्मितीची प्रक्रिया ही तीन स्वतंत्र संस्थांद्वारे होते. यामध्ये शिक्षण तज्ज्ञ असतात पण विषय तज्ज्ञ असत नाहीत. त्यामुळे फक्त अभ्यासमंडळे बरखास्त करून हा विषय संपणारा नाही.

प्रश्नोत्तरे
गणित आणि विज्ञानाची पाठय़पुस्तके देशभर एकच असली पाहिजेत की राज्यानं वेगळी पुस्तकं करायला हवीत या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ.प्रधान म्हणाले, ”प्रत्येक पुस्तकातच स्थानिक माहिती आली पाहिजे त्यामुळे राज्याने आपली वेगळी पाठय़पुस्तके करावीतच. शिवाय राज्यात पाठय़पुस्तकावर पृष्ठसंख्येची मर्यादा आहे, ती सुद्धा पाळावी लागते.” आपण शिक्षक आहोत याचा अभिमान बाळगून काम केले तर उत्तम काम करता येते, असेही त्यांनी सांगितले. परीक्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चिंदरकर म्हणाले, आपल्या शिक्षणव्यवस्थेत आणि शाळांमध्ये स्वयंअध्ययन म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. घोकंपट्टीच्या परंपरेमुळे स्वत:ची बुद्धी वापरून उत्तरे लिहिण्याची सवयच मुलांना लागत नाही. जेईई किंवा एनआयटीसारख्या परीक्षांमध्ये केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या वर्चस्वाचे कारण सांगताना, या परीक्षा एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित असतात अन् केंद्रीय बोर्ड हीच पुस्तके वापरते, असे अवनिता बीर म्हणाल्या. अभ्यासक्रम बदलण्याची-पुस्तक निर्मितीची प्रक्रिया या प्रश्नांबाबत बोलताना, अभ्यासक्रम बदलण्यात आला की पाठय़पुस्तके तयार करताना ती आठ भाषांमध्ये तयार करणे, विविध विषय, विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गटांना समान स्थान मिळणे अशा अनेक मुद्दय़ांचा विचार करावा लागतो आणि हे सर्व दोन वेगळ्या संस्थांकडून, स्वतंत्रपणे होते. शिवाय आक्षेप आल्यास, पुस्तकातील धडे बदलावे लागतात, असे पळशीकर म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 4:19 am

Web Title: what is education boards doing
Next Stories
1 गुन्हेगारांच्या शिक्षेचा टक्का वाढला
2 ‘शिवडी- न्हावाशेवा सेतू’ची निविदा प्रक्रिया पुन्हा अपयशी
3 वृद्धांच्या हाती पालिकेची काठी
Just Now!
X