राज्याच्या शिक्षण विभागाने अद्याप सह्य़ाद्री वाहिनीला ऑनलाइन शिक्षणाचा प्रस्तावच पाठवला नसल्याचे उघड झाले असून, रिलायन्स जिओसाठी केलेली घाई आणि दूरदर्शनबाबत होणारी दिरंगाई या मागील गोम काय, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

दीड महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने ऑनलाइन शिक्षणाकरिता रिलायन्सच्या जिओ कंपनीशी करार केला, पण ही तत्परता या सरकारला सह्य़ाद्री वाहिनीबाबत का दाखवता आली नाही? यात निश्चितपणे काळबेरे आहे. सह्य़ाद्री वाहिनीला अद्याप साधा प्रस्तावही पाठवलेला नाही. यावरून राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी किती अनास्था आहे, हे उघड होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे भातखळकर यांनी सांगितले.

राज्यामधील विद्यार्थ्यांना शुल्क वाढीमुळे शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली त्यांची लूट चालू आहे आणि अशावेळेला महाविकास आघाडीचे सरकार आणि शिक्षण मंत्री मात्र स्वत:करिता गाडय़ा घेणे आणि खाजगी कंपन्यांना मदत करण्यात मग्न आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.