मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी आंग्रिया क्रुझवर काढलेला सेल्फी चांगलाच गाजला. त्यांना अनेकांनी ट्रोल करण्यात आलं. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत अनोख्या अंदाजात या प्रश्नाला उत्तर दिलं. आजवर महाराष्ट्राने तरूण मुख्यमंत्री पाहिलेला नाही, तरूण मुख्यमंत्र्यांची तरूण पत्नीही पाहिलेली नाही. आता आमचं वयच सेल्फी काढण्याचं आहे आणि त्यांनी सेल्फी काढला त्यात गैर काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. अनेक लोक लपून सेल्फी काढतात अनेक खुलेपणाने काढतात. अमृता फडणवीस या माझ्या पत्नी असल्या तरीही त्या एक व्यक्ती म्हणून त्यांनी काय करायचे हे मी ठरवत नाही असेही फडणवीस यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.

असं असलं तरीही  मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांची सुरक्षित स्थळी जाऊन सेल्फी घेणं ही जबाबदारी नव्हती का? असाही एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला त्यावेळी मीडियाने कॅमेरा अँगल चुकीचा लावल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आंग्रियाच्या उद्घाटन सोहळ्याला मी, अमृता फडणवीस गेलो होतो. नितीन गडकरीही त्या ठिकाणी आले होते. अप्पर डेकवर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आमच्या सगळ्यांच्या देखत अप्पर डेकवर मी बसू का अशी परवानगी अमृता फडणवीस यांनी काढली. त्या अप्पर डेकवर काही वेळ बसल्या त्या सेल्फी घेत होत्या तेव्हा अँगल असा लावण्यात आला की त्या समुद्रातच पडतील. मात्र त्या जिथे बसल्या होत्या त्या डेकच्या खाली लोअर डेक होता असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आणि जे कोत्या मनोवृत्तीचे लोक आहेत ते अमृता फडणवीस यांना ट्रोल करतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रिया या क्रुझवर जाऊन सेल्फी घेतला ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. तसेच मी हवा खाण्यासाठी तिथे गेले होते सेल्फी काढण्यासाठी नाही असे स्पष्टीकरणही अमृता फडणवीस यांनी दिले. आज मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या वृत्ताचं खापर मीडियावर फोडलं आहे आणि पत्नीची म्हणजेच अमृता फडणवीस यांची पाठराखण करत त्या काहीही चुकीचं आणि बेजबाबदार वागल्या नसल्याचं म्हटलं आहे.