राज्यात लॉकडाउन आहे की अनलॉक सुरु झालाय? या संभ्रमात ठाकरे सरकार आहे अशी टीका मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे लोकांना अकारण हाल सहन करावे लागत आहेत असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत नितीन सरदेसाई?
“आज २९ जून, लॉकडाउन सुरु होउन जवळपास सव्वातीन महिने पूर्ण झाले. आता ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाउन सुरु करताना जी संभ्रमावस्था निर्माण केली गेली आहे. आज सकाळपासून पोलिसांनी अचानकपणे कारवाई सुरु केली आणि गाड्या अडवण्यास सुरुवात केली. नक्की सरकारचा काय निर्णय झाला आणि सरकारला काय अभिप्रेत आहे हे समजायच्या आतच ही कारवाई सुरु झाली. लोक आपल्या ऑफिसला जात असतील, कामासाठी निघाले असतील तर त्यांना अनंत अडचणी सहन कराव्या लागल्या. अनेकांच्या गाड्या जप्त झाल्या, मुंबईत प्रचंड मोठा ट्रॅफिक जॅम झाला कारण पोलिसांनी जागोजाग कारवाई सुरु केली होती. एका बाजूला सरकार म्हणतंय आम्हाला अर्थचक्राला गती द्यायची आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दुकानांमध्ये, कामावर, ऑफिसेसमध्ये लोकांनी कसं पोहचायचं? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अशात आता लोकांच्या गाड्याही जप्त केल्या जात होत्या आणि त्यांना कोर्टातून गाडी सोडवा असं सांगितलं जात होतं. अशावेळी लोकांनी काय करायचं? ट्रेनने प्रवासाची संमती नाही, बेस्ट बसमध्ये आजही अनेक लोकांना प्रवेश दिला जात नाही. मग लोकांनी आपल्या गाड्या घेऊन नाही निघायचं तर काय करायचं?”

“मुंबई पोलिसांना दोष द्यायचा नाही कारण ते सरकारी आदेशाचं पालन करत आहेत. जर सरकारच एवढं संभ्रमावस्थेत असेल तर लोकांनी पाहायचं कुणाकडे? सरकार एक पाऊल पुढे येतं तर चार पावलं मागे जातं आहे त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. रोजच्या रोज वेगळ्या अधिसूचना जारी करायच्या आणि लोकांना त्रास द्यायचा हेच करायचं आहे का? सरकारने आधी स्वतःशी ठरवलं पाहिजे की लॉकडाउन अधिक कडक करायचा की अनलॉक सुरु करायचं. जे निर्णय घेतले आणि बदलले जात आहेत त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. मागच्या तीन महिन्यात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना तीन महिने पगार मिळालेला नाही. त्या विवंचनेत त्यांच्या गाड्या जप्त झाल्या तर लोकांनी काय करायचं? सरकारला असे काही निर्णय घ्यायचे असतील तर तीन ते चार दिवस आधी त्याला प्रसिद्धी द्यावी” अशीही मागणी सरदेसाई यांनी केली आहे.