प्रसाद रावकर

भंगारातही खरेदी केले जात नसल्याने कचरावेचकांचा आखडता हात; पालिकेच्या वर्गीकरण केंद्रांवर भार

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेचा धाक कमी झाल्यामुळे विक्रेत्यांनी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला असताना दुसरीकडे बंदीयोग्य प्लास्टिक भंगारवाले खरेदी करत नसल्यामुळे कचरा वेचकांनी ते गोळा करणे बंद केले आहे. त्यामुळे या कचऱ्याचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिक बंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पालिकेने निरीक्षकांची फौज उभी करून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मात्र हळूहळू कारवाईचा वेग मंदावत गेल्यामुळे विक्रेते आणि नागरिकांमधील धाक कमी झाला असून पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य वस्तूंचा सर्रास वापर सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबईत गोळा होणाऱ्या कचऱ्यात बंदीयोग्य प्लास्टिकचे प्रमाण पूर्वीप्रमाणेच कायम आहे.

मुंबईमध्ये कचरा वेचकांची मोठी फौज असून कचराभूमी, रस्त्यावर साचणारा कचरा आदींमधून विक्रीयोग्य वस्तू गोळा करण्याचे काम ही मंडळी करत होती. देवनार कचराभूमीतील कचऱ्याला मोठी आग लागल्यानंतर पालिकेने कचरा वेचकांना तेथे प्रवेशबंदी केली. त्याचा त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला. म्हणून पालिकेने काही कचरा वर्गीकरण केंद्रांचे काम कचरा वेचक संघटनांना दिले आहे. या केंद्रांमध्ये येणाऱ्या कचऱ्यातून विक्री योग्य वस्तू वेगळ्या करण्यात येतात आणि नंतर त्या भंगारवाल्याला विकण्यात येतात. मात्र राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर मुंबईमधील भंगारवाल्यांनी बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्या खरेदी करणे बंद केले आहे. त्याचा फटका कचरा वेचकांना बसू लागला आहे. कचरा वेचकांनी हा कचरा जमा करणे सोडून दिल्याने कचऱ्या विल्हेवाटीची साखळीच विस्कळीत झाली आहे.

आता पालिकेच्या सफाई कामगारांमार्फत गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यातून प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू कचरा वर्गीकरण केंद्रात पोहोचतात आणि तेथे कचऱ्यातून त्या वेगळ्या करण्यात येतात. कचरा वर्गीकरण केंद्रात कचऱ्यातून वेगळे करण्यात येणारे बंदीयोग्य प्लास्टिक इंधन म्हणून सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

बंदीयोग्य प्लास्टिकच्या कचऱ्यात वाढ

* मुंबईत बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच वेळी पालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमध्येही कचऱ्यात सापडणाऱ्या बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचे प्रमाण वाढल्याचे आढळले आहे.

* पालिकेच्या १० विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये जुलै २०१८ मध्ये कचऱ्यातून ६८ हजार ५३९ किलो काचेच्या बाटल्या आणि अन्य वस्तू, दोन लाख सहा हजार ४६ किलो जाड प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू, तसेच १८ हजार ७०० किलो बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू वेगळ्या करण्यात आल्या.

* ऑगस्ट २०१८ मध्ये ४५ हजार ५६८ किलो काचेच्या बाटल्या आणि वस्तू, एक लाख ३६ हजार ७१५ किलो जाड प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू, तर २३ हजार ३५० बंदीयोग्य प्लास्टिक वेगळे करण्यात आले.

* जुलै-ऑगस्टमधील या आकडेवारीवरून कचऱ्यातील काचेच्या बाटल्या आणि वस्तूचे प्रमाण कमी होत असल्याचे, पण त्याच वेळी बंदीयोग्य प्लास्टिकचे प्रमाण काही अंशी वाढत असल्याचे आढळून आले आहे.

कचऱ्यात सापडणारे बंदीयोग्य प्लास्टिक भंगारवाले खरेदी करत नाहीत. त्यामुळे हे प्लास्टिक गोळा केल्यानंतर त्याचे करायचे काय, असा प्रश्न कचरा वेचकांसमोर उभा राहिला आहे. पूर्वी गोळा करण्यात येणाऱ्या या पातळ पिशव्या विकून दोन पैसे मिळत होते. पण आता भंगारवाले या पिशव्या घेत नसल्यामुळे कचरा वेचकांनीही त्या गोळा करणे बंद केले आहे.

– ज्योती म्हापसेकर, स्त्री मुक्ती संघटना