सध्या मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध भाजपा अशी राजकीय लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून आता भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारने नवीन मेट्रो कारशेडची ब्लू प्रिंट लोकप्रतिनिधींसमोर सादर करावी. सौनिक समितीचा अहवाल लोकांसमोर सादर करावा.” अशी मागी भातखळकर यांनी केली आहे.

तर, मेट्रो कारशेडला आडकाठी आणली जात असेल तर बुलेट ट्रेन प्रकल्पाला अजिबात सहकार्य करणार नाही, असा संदेश ठाकरे सरकारने केंद्राला दिल्याचे राज्य सरकारच्या भूमिकेतून दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून त्या म्हटले आहे की, “आरे येथील कारशेडला सर्व परवानग्या मिळाल्या असताना सुद्धा व तेथील ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालेले असताना देखील मेट्रो कारशे़ड इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय़ राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेताना मुंबईच्या बद्दल ‘चांगलाच’ विचार मुख्यमंत्र्यांनी केला असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नवीन ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याच्या नियोजनाचे व ब्लु प्रिंटचे मुंबईतील लोकप्रतिनिधीना सादरीकरण करावे.” , अशी आग्रही मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे मख्यमंत्र्यांकडे केली आहे.

“का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?”

तसेच, “ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड आरे येथून कांजूरमार्ग येथे हलविण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन राज्य सरकारला जोरदार चपराक दिली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सौनिक समितीचा अहवाल सुद्धा अद्याप खुला करण्यात आलेला नाही. कांजूरमार्ग येथील जागेचे पुढे काय होणार हे अद्याप ठरले नसताना सुद्धा आता महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मेट्रो कारशेड बीकेसी येथे स्थलांतरित करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे सांगून, मुंबईकरांच्या मनात आणखीच गोंधल निर्माण केला आहे.” असं देखील भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.